आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींसह पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील करोना बाधित आणि आकडेवारीसंदर्भात तसेच प्रशासकीय सज्जतेविषयी आढावा घेत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच मंडईमध्ये होणारी गर्दी टाळावी, असे आवाहनही हर्डीकर यांनी यावेळी केले.
शहरातील करोनाची स्थिती तसेच इतर बाबींसदर्भात आयुक्तांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना आयुक्त म्हणाले, शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी प्रत्येकाने काळजी घेतल्यास करोनाचा फैलाव रोखण्यात यश येईल. झोपडपट्टीमध्ये वाढणारे रुग्ण हे प्रशासकीय यंत्रणेसमोरील आव्हान आहे.
नागरिकांनी अपेक्षित सहकार्य करण्याची गरज आहे. गर्दी टाळण्यासाठी शहरातील मंडई दुपारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारीदेखील नागरिकांनी मंडईमध्ये होणारी गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिगचा अवलंब करावा.
पालकमंत्री अजित पवार हे रोज शहरातील करोना बाधितांचा तसेच प्रशासकीय यंत्रणेबाबत आढावा घेत आहेत. याशिवाय शहरातील सर्वच लोकप्रतिनिधींकडूनही आढावा घेतला जात आहे. करोनासाठी करण्यात आलेल्या कंट्रोल रुमचाही आपणाला फायदा होत असल्याचे आयुक्त म्हणाले. नागरिकांनी होम डिलिव्हरी करणाऱ्या यंत्रणेची मदत घेऊन बाहेर न पडता जीवनावश्यक वस्तू घरपोहोच मागवाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्वयंसेवकांची मदत
करोना बाधित आढळलेला परिसर शंभर टक्के बंद करण्यात आला असून घराबाहेर पडण्यास सर्वांना बंदी करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची फळी निर्माण करण्यात आली असून शंभर घरामागे एक स्वयंसेवक नियुक्त करण्यात आला आहे. या स्वयंसेवकांमार्फत संबंधित परिसरात जीवनाश्यक वस्तू तसेच गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी घराबाहेर न पडता स्वयंसेवकांची मदत घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आयुक्त यावेळी म्हणाले.