जिनिव्हा – भारतासह जगभरात करोनाने अक्षरशः मृत्यूचे थैमान घातले आहे. या महामारीला रोखण्यसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या लढाईत भारताने केलेल्या प्रयत्नांची जगभरात स्तुती होत आहे. तसेच अशा बिकट परिस्थितीत भारताने करोनाही दोन हात करताना इतर देशांनाही मदतीचा हात दिला आहे.
करोनाविरोधातील भारताच्या या लढाईचे कौतुक होत असताना स्वित्झर्लंडने देखील भारताला अनोखा सलाम केला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या आल्प्स पर्वत रांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारतीय तिरंगा झळकवत त्यांनी भारताचा एक प्रकारे सन्मान केला आहे. भारतीय तिरंगा मॅटरहॉर्न पर्वतावर लाईट्सच्या मदतीने झळकवला आहे.
युरोपमध्ये आल्प्स पर्वतरांगेला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या सुमारे 1200 किलोमीटर पसरलेल्या आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गिक सौंदर्यातले एक महत्त्वाचे नाव म्हणजे ही पर्वतरांग आहे. भारतात जसे हिमालयाचे महत्त्व आहे तसेच युरोपात आल्प्सचे महत्त्व आहे. मॅटरहॉर्न हे 14690 फूट उंचीचे आल्प्समधील 6व्या क्रमांकाचे गिरीशिखर आहे.
याच मॅटरहॉर्नवर स्वित्झर्लंडमधील लाईट आर्टिस्ट गेरी हॉफस्टेटर यांनी तिरंगा झळकवला आहे. याबाबत माहिती देताना भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुरलीन कौर यांनी याचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटरवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जवळपास 800 मीटर उंचीवर तिरंगा. हिमालयासोबत आल्प्सची मैत्री, धन्यवाद!’
मिळालेल्या माहितीनुसार या पर्वतावर मागील 24 मार्चपासून करोना महामारीविरोधात जगातील देशांची एकजूट दर्शवण्यासाठी विविध देशांचे झेंडे झळकवण्यात आले आहेत.
भारताकडून अनेक देशांना मदत
भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचे उत्पादन करतात. आता हे औषध करोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. भारताने अमेरिकेसह अनेक देशांना या औषधाचा पुरवठा केला आहे. याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले आहेत.