महापौर उषा ढोरे यांची आयुक्तांना सूचना
पिंपरी (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट असणारे कामगार, गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागात धान्य वाटप करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धान्य खरेदी करून वाटपासाठी देण्यात यावे. तसा प्रस्ताव नजीकच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवावा, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
शहरामध्ये सध्या स्वस्त धान्य दुकानांतून नियमित आणि मोफत धान्य वाटप सुरू आहे. हे धान्य वाटप करताना अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांनाच दिले जात आहे. काही जणांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही. तर, ज्यांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत आहे, त्यांना देखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अन्नधान्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे खुप हाल होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मोफत धान्य वाटप करणे आवश्यक आहे, अशी भूमिका महापौर ढोरे यांनी मांडली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1190978344575202/
महापौर ढोरे यांनी याबाबत आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांना तांदूळ व गहू दिले जात आहेत. मात्र, वितरणातील अडचणीमुळे अनेक नागरिकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. गरीब व हातावर पोट असणारे नागरिक मदतीसाठी दारोदार फिरत आहेत. मदत मिळावी म्हणून नगरसेवकांकडे जात आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या प्रभागात धान्य वाटपासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धान्य खरेदी करून द्यावे.
“नागरिकांची अन्नधान्याशिवाय होणारी अडचण लक्षात घेता गरीब, गरजू आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना धान्य मिळावे यासाठी प्रत्येक नगरसेवकाला महापालिकेमार्फत पाच लाख रुपयांचे धान्य खरेदी करून मिळावे, असे आदेश आयुक्तांना दिले आहेत. नगरसेवक त्यांच्या प्रभागातील परिस्थिती पाहून या धान्याचे वाटप करतील.”
– उषा ढोरे, महापौर.