कविता शेटे
सांगली – इस्लामपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढताच उच्चपदस्थ अधिकारी रस्त्यावर उतरून काम करून लागले. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रात्रीचा दिवस सुरू आहे. मिरजेत जनमानसात मिसळून काम करणाऱ्या दबंग आयपीएस अधिकारी संदीपसिंह गिल यांची मात्र सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
इस्लामपूर करोनाबाधितांचे केंद्र बनले आहे. तर मिरज हे करोना सेंटर बनले आहे.
मिरज अतिसंवेदनक्षम म्हणून ओळखले जाते. या शहरात पोलिस उपअधीक्षक म्हणून आयपीएस संदीपसिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीच्या काळापासून त्यांनी शहरात जोरदार कारवाया सुरू केल्या होत्या. मटकेबहाद्दारांच्या मनात तर गिल या नावाची धडकी भरली आहे. मिरजेत या दबंग अधिकाऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. जरी ते आयपीएस असले तरी काम करण्याची पद्धत मात्र एकदम वेगळी असून लोकांवर दंडुका उगारण्याऐवजी त्यांचे समाजप्रबोधन करून मनपरिवर्तन करण्याकडे त्यांचा कल आहे.
करोनाच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. इतरत्र रस्त्यावर फिरल्यास त्यांना लाठीचा प्रसाद देण्यात येत आहे. परंतु, मिरजेत या अधिकाऱ्याने मात्र लाठी बाजूला ठेवून “चलो लोगों मे…’ असा नारा दिलो. विनाकारण फिरताना आढळला तर त्याला मारहाण न करता त्याला उन्हात बसवणे, त्याला उठबस करायला लावणे आदी शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्या नागरिकाला शिक्षा करण्यात येत आहे. त्याच्यासोबत स्वत:देखील उठबस करून त्याचे मन जिंकले आहे.
एप्रिल महिना विविध जयंती, उत्सव, जत्रांचा महिना आहे. परंतु, करोना रोखण्यासाठी लॉकडाऊन असल्याने या कालावधीत कोणीही घराबाहेर पडू नये, यासाठी सर्वधर्मीयांमध्ये मिसळून त्यांचे समाजप्रबोधन करण्याचे कार्य गिल यांनी सुरू केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये या दबंग अधिकाऱ्याच्या आदरयुक्त भीतीबरोबरच त्यांच्याविषयी आपुलकीदेखील निर्माण झाली आहे. काही जणांकडून या अधिकाऱ्याचा टिकटॉक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेकांच्या व्हॉट्सऍप स्टेट्सवर फक्त आणि फक्त या अधिकाऱ्याचा व्हिडिओ पाहवयास मिळत आहे.
तसेच संदीपसिंह गिल मिरजेत रुजू होताच त्यांनी कायदा व सुव्यस्थेची पायमल्ली होऊ नये, यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणीदेखील केली आहे. गिल यांनी शहरातील मटका तसेच सावकारांचे कंबरडे मोडून काढले आहे. सावकारी करून सामान्य नागरिकांच्या मानगुटीवर बसलेल्या 11 सावकांरावर त्यांनी मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच आता करोना कालावधीत देखील ते सामान्य नागरिकांमध्ये मिसळून कार्य करीत असल्याने मिरजेतील नागरिकांमध्ये गिल यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रेझ निर्माण झाली आहे. त्यांच्या दबंग कार्यामुळे आयपीएस गिल यांनी जनतेचे ह्रदय मात्र जिंकले आहे.
कायदा व माणुसकीची सांगड
आयपीएस अधिकारी संदीपसिंह गिल यांनी शहरात कायद्याबरोबरच माणुसकीची देखील सांगड घातल्याचे दिसून येते. अधिकारी असलो तरी नागरिकांच्या सेवेसाठी आहोत, ही भावना ठेवून त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे. परंतु, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच प्रसंगानुसार जनमानसात मिसळून काम करीत असल्याने त्यांनी कायद्यासोबत माणुसकीचीदेखील उत्तम सांगड घातली असल्याचे दिसून येते.