४० रुपयाला तांब्या तर ७० रुपयाला एक लिटर…..
न्हावरे(प्रतिनिधी) :- शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून न्हावरे (ता.शिरूर) परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारू मिळत आहे. कोणाच्या आशिर्वादाने गावठी दारूचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच गावठी दारू बंद करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
बिअर बार बंद असल्यामुळे गावठी दारूचा धंदा जोरात सुरू आहे. तसेच गावठी दारूचा रेटही तेजीत आहे. गावठी दारूची एक लिटरची बाटली ७० रुपयांना मिळत आहे. तर एका तांब्याचा रेट ४० रुपये आहे. लॉक डाऊन असूनही संध्याकाळच्या वेळेस तळीराम न्हावरे चौकात आणि आलेगाव फाटा येथे फिरताना दिसत आहेत.
“अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांना ग्रामपंचायतीने वेळोवेळी धंदे बंद करण्यासाठी तंबी दिली.मात्र, सध्याच्या परिस्थितीचा गैर फायदा घेऊन अवैध गावठी दारू विक्रेते दारू विकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे मागणी केली आहे”. – ताई अरुण तांबे, सरपंच न्हावरे.
शासनस्तरावर करोनासारख्या महामारीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच आणीबाणी सदृश्य परिस्थित निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात न्हावरे गावासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारूचा व्यवसाय सुरू आहे.
“पोलिसांवर सध्या लॉक डाऊनच्या काळात कामाचा तान आहे.तरीही शिरूर पोलिस अवैध गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. न्हावरे परिसरातील अवैध गावठी दारू धंद्यावरही कारवाई करण्यात येईल.तसेच उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई करावी असे खानापुरे यांनी सांगितले”. – प्रवीण खानापुरे , पोलिस निरीक्षक, शिरूर.