पुणे : पुण्यामध्ये करोनामुळे पहिला बळी गेला आहे. करोनामुळे पुण्यात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. ५२ वर्षीय व्यक्तीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे विकार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यातील करोना बाधितांचा आकडा सोमवारी आणखी वाढला आहे. राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
पुण्यामध्ये कोरोनाने पहिला बळी घेतल्याच्या वृत्तास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दुजोरा दिला असून सदर रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधी पूर्वीपासूनच जडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत बोलताना, “सदर रुग्णास २२ मार्च रोजी शहरातील एका खासजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न आज निष्फळ ठरले असून त्याचा मृत्यू झाला आहे.” अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.