कोल्लम : परदेशात आपला हनिमून आटोपून आल्यानंतर राज्य सरकारने दिलेला होम क्वारंटाईनचा (घरी विलगीगीकरण) आदेश मोडल्याबद्दल केरळमध्ये एका तरूण आयएएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्लमचे उपजिल्हाधिकारी अनुप मिश्रा यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे कोल्लमचे जिल्हा पोलिस अधिक्षक टी. नारायणन यांनी सांगितले. मिश्रा हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. जिल्हाधिकारी बी. अब्दूल नासेर यांनी सांगितले की, या अधिकाऱ्यावर कारवाई हा गंभीर प्रकार आहे. मिश्रा हे मलेशिया-सिंगापूर ट्रीप आटोपून 19 मार्चला आले होते. परदेशातून आलेल्या व्यक्तींना घरीच विलगीकरणात राहण्याचे आदेश आचार संहितेनुसार देण्यात आले आहेत. मिश्रा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांच्या सुरक्षा रक्षकासह त्यांच्या व्यक्तीगत कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मात्र, या अधिकाऱ्यांनी कोणालाही कल्पना न देता त्यांच्या भावाच्या घरी बंगळुरू येथे प्रयाण केले. ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांनी आपण बंगळुरूमध्ये असल्याचे सांगितले, असे नासेर म्हणाले.
मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मिश्रा यांचे मोबाईल लोकेशन कानपूर दाखवत आहे. घरी विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी आलेल्या पथकाला कोल्लम येथे त्यांच्या निवासस्थानात आढळले नाहीत. त्यांच्या घराच्या वीजेचे स्वीचही बंद आढळले.
आपले कार्यक्षेत्र सोडून एखादा अधिकारी बाहेर जात असतो. त्यावेळी त्याने त्याची कल्पना सरकारला देणे बंधनकारक असते.