पोलीस, व्यापाऱ्यांच्या आवाहनानंतर प्रतिसाद
पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान, दूध, फळे, भाजीपाला, औषधालये आदी वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याबाबत आदेश दिले असतानाही आज शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासूनच दुकाने खुली होती. तथापि, दुपारनंतर काही व्यापारी व पोलिसांनी प्रत्यक्ष बाजारपेठांमध्ये फिरत दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. त्यानंतर पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेतील दुकाने बंद झाली. अन्य बाजारपेठांमध्ये मात्र काही दुकाने खुली, काही दुकाने बंद असे चित्र पाहण्यास मिळाले.
पिंपरी बाजारपेठेत सकाळपासून दुकाने खुली ठेवलेल्या व्यापाऱ्यांनी दुपारी दुकाने बंद करण्यास सुरवात केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. याबाबत माहिती घेतली असता काही व्यापारी व पोलिसांनी आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी ही दुकाने बंद केल्याचे सांगण्यात आले. पिंपरीतील कापड बाजार, मोबाइल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आदी दुपारनंतर बंद करण्यात आली.
चिंचवडगाव येथे काल रात्रीच पोलिसांनी दुकाने बंद करण्याबाबत फिरून आवाहन केले होते. त्यानुसार आज चिंचवडगाव येथील बाजारपेठेतही बहुतांश दुकाने बंद असल्याचे चित्र दिसले. निगडी-प्राधिकरण परिसरात काही दुकाने बंद, काही खुली असे चित्र होते. भोसरी-आळंदी रस्त्यावरील दुकाने बंद करण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. भोसरी-लांडेवाडी रस्ता येथील दुकाने मात्र सुरू होती. उद्याने, सिनेमागृह, नाट्यगृह, शाळा व महाविद्यालय, व्यायामशाळा यापूर्वीच बंद करण्यात आलेली आहेत. शहरातील प्रमुख मॉल्समध्ये अत्यावश्यक किराणा सामान वगळता अन्य साहित्य विक्री बंद करण्यात आली होती.
काही व्यापाऱ्यांनी सकाळी दुकाने उघडली होती. दुपारनंतर मात्र काही व्यापाऱ्यांनी स्वतः बाजारपेठेत फिरुन दुकाने बंद करण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. करोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे.
– गजानन बाबर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन