मुदत न चुकवण्याचे आयकर विभागाचे आवाहन
नवी दिल्ली – आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक असून त्याची अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत आहे. ही मुदत नागरीकांनी चुकवू नये असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. 31 मार्च नंतर आधार कार्डाला न जोडलेला पॅन कार्ड नंबर बाद केला जाणार आहे असेहीं या विभागाने म्हटले आहे.
या साठी नागरीकांनी बायोमॅट्रिक आधार ऑथेंटिकेशनची मदत घ्यावी किंवा एनएसडीएल आणि युटीआयटीएसएल च्या पॅन कार्ड सर्व्हिस सेंटरची मदत घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या ट्विटरवर हे लिंकींग कसे करायचे या विषयीचा व्हिडीओही टाकण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार देशातील 30 कोटी 75 लाख पॅन कार्डे आधारला लिंक करण्यात आली आहेत. त्यावेळी देशातील 17 कोटी 58 लाख पॅन कार्डधारकांनी आपले कार्ड आधारला लिंक केले नव्हते. 31 मार्चच्या निर्धारीत मुदतीनंतरही जे लोक आधार व पॅन कार्ड लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन नंबर बाद होतील व त्यांच्यावर आयकर कायद्याच्या संबंधीत कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते असेही आयकर विभागाने कळवले आहे. ज्यांची पॅन कार्ड बंद करण्यात येतील त्यांनी आधार लिंक केल्यानंतर ही कार्डे पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहेत.