साईबाबा सेवाधाम ट्रस्ट : 15 अंध मुलींच्या जीवनाला मिळाली नवी दिशा
कामशेत – समाजातील अशिक्षित, अपंग व अंध महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी मावळातील कान्हे येथील साईबाबा सेवाधाम ट्रस्टकडून मागील अनेक वर्षांपासून काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा ध्यास या सामाजिक संस्थेने घेतला आहे.
ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यसाठी साईबाबा सेवाधाम ट्रस्टकडून गावा-गावात जाऊन महिला व मुलींना पेपर बॅग बनविणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, कापडी पिशव्या बनविणे, केन वायर विणून बॅग बनविणे, राख्या बनविणे इत्यादी अनेक वेगवेळ्या वस्तू बनविण्याचे शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या या वस्तूंचे मार्केटिंग करण्याचे व त्यांना कचा मला उपलब्ध करून देण्याचे काम देखील ट्रस्टकडून केले जात आहे .
विशेष म्हणजे 15 अंध मुलींना संस्थेकडून स्वतःची सर्व कामे स्वतः करणे, जेवण बनविणे, स्मार्ट फोनचा वापर करणे, आर्थिक व्यवहार करणे व केन वायर पासून बॅग बनविणे इत्यादी अनेक कला शिकवून त्यांना स्वावलंबी बनविले आहे तसेच त्यांची लग्न देखील लाऊन दिली आहेत. या अंध महिला घरकाम सांभळून मिळणाऱ्या वेळात केनवायर विणून बॅग बनून त्यापासून महिन्याला पाच ते सहा हजार रुपये दर महिना कमवून संसाराला हातभार लावत आहेत.
अंध महिलांनी केन वायर पासून बनविलेल्या बॅगला मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या “काळाघोडा’ प्रदर्शनात विशेष मागणी असते. यामुळे या अंध महिलांना एक कायमस्वरूपी रोजगार मिळतो आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळून देण्यसाठी देखील मदत केली जाते. अंध महिलांच्या या कामातून निराश झालेल्याना प्रेरणा मिळत आहे. साईबाबा सेवाधाम ट्रस्टकडून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून डॉ. स्वाती वेदक या विनावेतन काम करत आहेत.