पारनेर -पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह तालुक्यातील खडकवाडी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाडसी कारवाई करत वाहने ताब्यात घेतली व त्यावर 9 लाख 49 हजाराची दंडात्मक कारवाई केली. तहसीलदारांनी भल्या पहाटे चारच्या सुमारास केलेल्या कारवाईमुळे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत.
तहसीलदार देवरे यांनी गुरुवारी (दि. 5) रात्री अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत ही कारवाई केली. या वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांगपत्ता लागू न देता त्यांनी आळेफाटा मार्गे जात जवळपास तीन ते चार तास नाल्यांमध्ये पथकासह लपून बसत पहाटे 4 च्या सुमारास अचानक या वाहनावर धाड टाकत ही कारवाई केली. यामध्ये एम एच 16 ए वाय 7027 हा क्रमांक असणारे दोन वाहने आढळून आले. तसेच दोन वाहनावर नंबर प्लेट नसल्याचे आढळून आले.
ही सर्व वाहने पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. दोन्ही वाहनांची एकच नंबर प्लेट असल्याचे आढळून आले त्यापैकी एक वाहन चालकाने पळवून नेले. त्या वाहनावर तलाठी शिरसाठ यांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या वाहनाचा तपास सुरू आहे.
या पथकामध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांसह तलाठी एस. एस. मोरे, ए. बी. मंडलिक, ए. बी. डोळस, एस. एच. झावरे, पोलीस उपनिरीक्षक पी. टी. वाघ, आर. एल. शेलार, ए. एन. रोकडे, बी. के. गायकवाड याचा समावेश होता. पारनेर तालुक्यात वारंवार वाळूतस्करांवर कारवाई करूनही अवैध वाळू वाहतूक सुरुच आहे.