सीतापुर – मुलगा अब्दुल्ला आझम याच्या चुकीच्या जन्म दाखल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले सपा खासदार आझम खान यांना आज कोर्टाच्या सुनावणीसाठी सीतापुरहून रामपुर येथे आणले होते. यावेळी कारागृहात आपल्याला अमानवी वागणूक मिळत असल्याची तक्रार त्यांनी पत्रकारांपुढे बोलून दाखवली.
आझमखान यांच्यासोबतच पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांनाही आज कारागृहात हजर करण्यात आले होते. या तिघांनाही गुरूवारी रामपुरहून सीतापुरच्या कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 2 मार्च पर्यंत आहे.
उत्तरप्रदेशात 2017 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुक अर्जात आझम खान यांचे चिरंजीव अब्दुल्ला आझम यांनी खोटा जन्म दाखला सादर केला होता. वयाच्या निकषानुसार ते ही निवडणूक लढवण्यासच अपात्र ठरत असताना त्यांनी खोटा दाखला देऊन अर्ज भरला आणि ही निवडणूक जिंकली म्हणून त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.