फायर एस्टिंग्विशर रिफिलिंगची तारीख उलटूनही हालचाली नाहीत
पुणे – रस्त्यांवर उभ्या राहिलेल्या खाऊच्या गाड्यांवरील गॅस सिलेंडर जप्त करणे, अस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे अशा गोष्टींवर महापालिका जोरदार धडक कारवाई करत असते. परंतु, जेव्हा महापालिका भवनाचीच सुरक्षा व्यवस्था कुचकामी असते तेव्हा काय, असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. महापालिका भवनात जर आगीसारखी दुर्घटना घडली तर तर त्यासाठी आवश्यक असणारे फायर एस्टिंग्विशरची “फिलींग’ मुदत मागील वर्षीच संपली आहे, असे असतानाही ते अद्याप पुन्हा भरण्यात आले नाहीत.
मंत्रालय परिसरात जीएसटी भवनला आग लागण्याचा प्रकार नुकतीच घडला होता. त्या आधीही मंत्रालयात मोठी आग लागली होती. त्यानंतर सगळीच सरकारी आस्थापने खडबडून जागी झाली आणि अग्निरोधक यंत्रणा सर्वांनी खास तरतुदी करून बसवून घेतल्या. त्यावेळी महापालिका भवनातही कोट्यवधी रुपये खर्चून ही यंत्रणा बसवून घेण्यात आली. वास्तविक त्यानंतर याची वेळोवेळी चाचणी घेणे, याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक असते. असे असताना या यंत्रणेची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याचे या “फिलींग डेट’ वरून लक्षात येते.
महापालिका भवनाची विस्तारित इमारत बांधली असली आणि तेथे पक्षाची कार्यालये असली तरी मुख्य इमारतीमध्ये महापालिका आयुक्त आणि अन्य सर्व अधिकारी यांची कार्यालये आहेत. याठिकाणीच रोज हजार नागरिक कामानिमित्त येतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या हलगर्जीपणामुळे ऐरणीवर आला आहे. महापालिका भवनातील जुन्या इमारतीत हे सिलेंडर बसवण्यात आले आहेत.
त्या प्रत्येक सिंलेडरवर त्याची पुढची रिफिलींगची तारीख टाकण्यात आली आहे. ती तारीख ऑक्टोबर 2019 मधील आहे. त्यावर एक वर्षांची वॉरंटी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ही वॉरंटी संपली असून, रिफीलींगची तारीखही उलटून गेल्याचे यावरून स्पष्ट होते. याशिवाय महापालिकेत बसवण्यात आलेल्या फायर फायटिंग सिस्टिमची चाचणीही घेतली जात नसल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे.