वाहतूककोंडीपुढे पोलिसांनी टेकले हात

पार्किंग व्यवस्थेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिक हैराण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या वाहतूककोंडीपुढे अक्षरशः वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनीच हात टेकले आहेत. याचा सर्वात मोठा फटका येथील रहिवासी व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बसत आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने जेथे जागा मिळेल तेथेच वाहन पार्क करतात. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प आहे. यावर काही उपाययोजना करताना दिसत नाही.

वाहतूककोंडी फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. बाजापेठ परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्या पाहता भाजीमंडईजवळ असलेली पार्किंगची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे रस्त्यात लावलेल्या वाहनांनी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून जोपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्‍न शहरवासीयांची यातून सुटका होणार नाही, असे वाहतूक पोलिसांचे मत आहे.

महापालिका क्षेत्रातील पिंपरी ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता या ठिकाणी होत असल्याने ग्राहकांचा मोठा ओढा येथे असतो. मात्र, येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाला वाहन पार्किंगचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे नागरिक जेथे जागा भेटेल तेथे गाडी पार्क करून खरेदीसाठी जातात. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यात गाडी पार्क केल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा ठरते. परिणामी वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीचा हा प्रश्‍न सुटीच्या दिवसी व रोज सायंकाळी वाहतूककोंडी होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या वाहतूक पोलिसांनी अक्षरशः हात टेकले आहेत.

पार्किंगसाठी जागा नसल्याने अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे पिंपरी बाजारपेठेतील वाहतुकीचा प्रश्‍न हा वाहतूक नियोजन करून सुटू शकत नाही. यासाठी महापालिकेला येथून जवळच असलेल्या एका खासगी कंपनीच्या भूखंडावर पार्किंग व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, याबाबत कुठल्याही हालचाली महापालिका प्रशासनाकडून होत नाहीत.

अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांना कारवाई करावी लागते. मात्र, कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना अडचणी येत आहेत. येथील वाहनांवर कारवाई करून थोडीफार येथील स्थिती सुधारावी, असा विचार वाहतूक पोलिसांकडून केला जातो. मात्र, येथील चारचाकी वाहनांना उचलण्यासाठी टोईंग वाहने वाहतूक पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने केवळ ऍनलाइन दंड, समज व वाहतूक नियमन केले जाते. येथील परिसरात पोलीस कारवाईची वचक नाही. त्यामुळे येथील वाहतूककोंडीत अधीकच भर पडत आहे. याबात स्मार्ट सिटी होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला याबाबत कधी जाग येणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

पिंपरी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, ग्राहकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी वाहनतळ नसल्याने त्यांना रस्त्यावरच आपली वाहने पार्क करावी लागत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी होत आहे. येथील परिसरात पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहतूककोंडीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.
– प्रदीप लोंढे, पोलीस निरीक्षक, पिंपरी वाहतूक शाखा

खरेदी करण्यासाठी सहपरिवार पिंपरी बाजारात येतो. मात्र, येथे वाहन पार्क करण्यास जागा नसते. तेव्हा वाहन पार्क करायचे तरी कुठे हे वाहतूक पोलिसांनीच सांगावे. येथे आल्यावर गाडी रस्त्यात पार्क केल्याने गाडीजवळ एकजणाला थांबावे लागते. पोलिसांच्या कारवाईकडेदेखील लक्ष द्यावे लागते. काही वेळेस पोलिसांबरोबर भांडण होते. तेव्हा महापालिका प्रशासनाने नागरिकांची समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर पार्किंगची व्यवस्था करावी.
– किशोर मोहिते, कासारवाडी

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.