थेऊर – माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे महेश आगलावे यांनी श्रींची पूजा केली, तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने चिंतामणीची महापूजा करण्यात आली.
यावेळी विश्वस्त ह. भ. प. आनंद महाराज तांबे उपस्थित होते. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि आगलावे बंधूच्या वतीने मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने स्वच्छतागृहाची व्यवस्था, ग्रामपंचायतीमार्फत पार्किंगची अद्ययावत व्यवस्था करण्यात आली. नेहमीप्रमाणे रमाकांत पवार यांनी फुलांची आरास केली. चिंतामणी तरुण मंडळातर्फे उपवासाचा चिवडा वाटण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर आणि परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. संपूर्ण व्यवस्थेवर चिंचवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त ह. भ. प. आनंद महाराज तांबे व व्यवस्थापक डॉक्टर पोफळे यांचे नियोजन होते.