उंब्रजच्या पैलवानांचा घरच्या मैदानावर दबदबा
उंब्रज – उंब्रजच्या कुस्ती मैदानात मुरुडचा पैलवान रोहन रंडे आणि रहिमतपूरचा प्रतीक माने यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेर ही कुस्ती पॉइंटवर खेळवण्यात आली. यामध्ये पै. रोहन रंडेने गुण मिळवून यंदाचा उमेश्वर केसरी किताब पटकावला.
या मैदानात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक नामांकित पैलवानांच्या कुस्त्या लक्षणीय ठरल्या. तसेच उंब्रज येथील भैरवनाथ तालीम संघातील पैलवानांनी घरच्या मैदानात दबदबा राखताना प्रतिस्पर्धी पैलवानांना धूळ चारली.
उंब्रज ता. कराड येथील कै. रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ कुस्ती कोच पै. प्रल्हाद जाधव यांनी इनामी कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले होते.
उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या हस्ते या कुस्ती मैदानाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, माजी सभापती संभाजीराव यादव तसेच कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या 13 वर्षांपासून येथे उमेश्वर केसरी किताबासाठी महत्वपूर्ण लढत होते. पै. रोहन रंडे याला मानाची चांदीची गदा व उमेश्वर केसरी किताबाचा मान देवून गौरविण्यात आले.
त्याचबरोबर 75 हजार इनामासाठीच्या कुस्तीत पै. वास्तव साळुंखे रहिमतपूर व सुमित भोसले कोल्हापूर यांच्यामध्ये संघर्षमय लढत झाली. यामध्ये पै. सुमित भोसले विजयी ठरला. तर तीन नंबरची कुस्ती पै. आण्णा पाटील म्हासोली व पै. शुभम लोखंडे शिवाजी आखाडा कराड यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र बराचवेळ कुस्ती निकाली न झाल्याने ती बरोबरीत सोडवण्यात आली.
अहमदनगरच्या दिपराज भोसलेने दुहेरीपट काढताना कोल्हापूरच्या पै. साळुंखेला चितपट केले. तसेच सैदापूरच्या पै. रणजित फडतरेने कोल्हापूरच्या पै. सचिन गायकवाडला चितपट केले. सापच्या पै. अक्षय जाधवने पै. कोल्हापूरच्या सचिन पाटीलला चितपट केले. किवळच्या अनिल जाधवने तारगावच्या सुशांत भोसलेवर विजय मिळवला.
कालेतील पै. संदीप पाटीलची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. महिला कुस्तीत पै उज्ज्वला साळुंखेनी पै ऐश्वर्या पवारला चितपट केले. तर उंब्रजच्या प्रणोती जाधवने बाली लोखंडेला चितपट केले. तसेच स्नेहल वायदंडेने अंकिता पवारला तर श्रावणी भोसलेने व अंजली गायकवाडवर विजय मिळवला. महिला कुस्ती मैदानाचे खास आकर्षण ठरल्या. तसेच उंब्रज येथील पैलवान प्रणव जाधव, अमित पाटोळे, राम चव्हाण, ओंकार वाघमारे, निळकंठ यादव, महेश कोळी यांनी घरच्या मैदानात दबदबा राखला.