भाळवणी येथील पडलेल्या शाळेची केली पाहणी : ग्रामस्थांनी उघड्यावर भरविले वर्ग
पारनेर/भाळवणी – पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची रविवारी (दि.9) दुपारी भिंत कोसळली. सुदैवाने सुटी असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी पालकांनी व ग्रामस्थांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच उघड्यावरच वर्ग भरविण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे अध्यक्ष काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे, पारनेरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब बुगे, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत बसवू दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वर्ग उघड्यावर भरविण्यात आले. अनेक वर्षांपासून शाळेची इमारत बांधण्याची मागणी असूनही त्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पालकांनी प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले.
यावेळी पालकांशी बोलताना जगन्नाथ भोर म्हणाले, संपूर्ण जिल्हाभरात सुमारे एक हजार 400 वर्ग खोल्या धोकादायक असून, त्या तातडीने नवीन बांधण्याची आवश्यकता आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे निधीची कमतरता असल्याने आवश्यक त्या ठिकाणी तातडीने वर्गखोल्या बांधण्यात येतील, असे सांगितले. भाळवणी शाळेसाठी तातडीने चार खोल्या बांधण्यात येतील.
तसेच आमदार नीलेश लंके यांच्या निधीतून दोन, तर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून दोन खोल्या बांधण्याचे नियोजन असल्याने येत्या वर्षभरात इमारत पूर्ण होण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया झावरे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना शाळा बांधकामासाठी निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी सरपंच लीलाबाई रोहोकले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे, संभाजी रोहोकले, बाबाजी तरटे, बबन चेमटे, अशोक रोहोकले, गंगाराम रोहोकले, ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर, संभाजी आमले, सुलतान शेख, संदीप व्यवहारे, सुभाष रोहोकले, नंदकुमार चेमटे, अरुण रोहोकले, संतोष चेमटे, मुख्याध्यापक श्रीपती आबूज, बाळासाहेब खोडदे, भैया रोहोकले आदिंसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.