नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी 15 सदस्यांच्या ट्रस्टची घोषणा बुधवारी केली. त्यापठोपाठ रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सरकारच्या वतीने एक रुपया देणगी देऊन ट्रस्टच्या कार्याची औपचारिक सुरवात करण्यात आली.
केंद्र सरकारच्या वतीने ही रक्कम गृह खात्याचे उप सचिव डी मुर्मु यांनी दान केली. हा ट्रस्ट देणगी, अनुदान, वर्गणी, मदत किंवा स्थावर अथवा जंगम स्वरूपाची मालमत्ता स्वीकारू शकतो, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
हा ट्रस्ट सुरवातीला ज्येष्ठ विधिज्ञ के. परासारन यांच्या निवासस्थानातून काम पाहील. नंतर त्याचे स्वतंत्र कार्यालय असेल, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. दरम्यान काही ज्येष्ठ संतांचा समावेश या ट्रस्टींमध्ये नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्यांनी गुरूवारी दुपारी बैठक बोलावली आहे.
भव्य आणि उदात्त असे राममंदिर उभारण्यासाठी 15 सदस्यांच्या ट्रस्ट उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली. सर्वोच्च न्यायलयाने ट्रस्ट उभारण्यासाठी दिलेली तीन महिन्याची मुदत संपण्याआधी चार दिवस ही घोषणा करण्यात आली.