मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटी मालिकेसाठी संघाची निवड केली. दुखापतीने मायदेशी परतलेल्या रोहित शर्माच्या जागी कसोटी संघात युवा शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे तर पृथ्वी शाॅने संघात पुनरागमन केले आहे.
पाचव्या टी-२० सामन्यात फलंदाजीदरम्यान वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले. त्यानंतर त्याने रिटायर्ड हर्ट होत मैदान सोडले व तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. त्यामुळे रोहित न्यूझीलंडविरूध्दच्या एकदिवसीय व कसोटी मालिकेला मुकणार आहे.
India’s Test squad: Virat (Capt), Mayank, Prithvi Shaw, Shubman, Pujara, Ajinkya Rahane (vc), Hanuma Vihari, Wriddhiman Saha (wk), Rishabh Pant (wk), R. Ashwin, R. Jadeja, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Mohd. Shami, Navdeep Saini, Ishant Sharma (subject to fitness clearance).
— BCCI (@BCCI) February 4, 2020
पृथ्वी शाॅ २०१८ नंतर प्रथमच कसोटी क्रिकेट खेळेल. त्याला कसोटी संघात मयंक अग्रवालसह सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकीपटू कुलदीप यादव आणि सध्याचा मर्यादित षटकातील सामन्याचा यष्टीरक्षक लोकेश राहुल यांना देखील कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.
कसोटीसाठी फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर विश्वास कायम ठेवण्यात आला आहे. त्याबरोबरच युवा गोलंदाज नवदीप सैनी यालाही कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, इशांत शर्मा (तंदुरुस्त झाल्यास).