बीजिंग : जागतिक आरोग्य संघटनेनं नोवेल कोरोना व्हायरसमुळे आलेल्या जागतिक धोक्याची पातळी मध्यम वरुन उच्च स्तरापर्यंत वाढवली आहे. रविवारपर्यंत कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या दोन हजार 14 वर गेली, त्यात एकट्या चीनमधल्या रुग्णांची संख्या एक हजार 985 होती.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतच्या चर्चांसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कालच बिजिंगला पोचले आहेत. या विषाणूच्या बाधेमुळे आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला आहे आणि जगभरात 4,600 हून अधिक लोकांना त्याची बाधा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर वूहानमधल्या भारतीयांना तिथून हलवण्यासंदर्भात भारतीय दूतावास चीन सरकारशी चर्चा करत आहे.
तर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने वुहानसाठी श्रेणी क्रमांक 4 च्या सूचनावली जारी केली आहे. लोकांनी हुबेई प्रांतात न जाण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे. सर्व चीनसाठी 3 क्रमांकाची सूचनावली जारी करण्यात आली आहे. लोकांनी चीनचा प्रवास करण्यासाठी पुनर्विचार करावा, असा याचा अर्थ आहे.
वुहान शहरातील अमेरिकेचे नागरिक आणि राजकीय मुत्सद्यांना तेथून बाहेर काढले जात आहे. फ्रान्स आणि जपानही आपल्या देशांच्या नागरिकांना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये विषाणूच्या प्रादुर्भावाचे पुन्हा मूल्यमापन केले. प्रादेशिक धोका अतिउच्च असला तरी आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली पाहिजे, असा याचा अर्थ नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
नोव्हेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चीनला विश्वास आहे, असे बीजिंगमधील डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले. नागरिकांनी घाबरून चीन सोडून निघून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, विषाणूच्या उद्रेकानंतर वुहानचे महापौर झोऊ झियानवांग यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.