महाळुंगे इंगळे – तीस वर्षीय तरुण व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करून त्याला जबरदस्तीने डांबून ठेवत मारहाण करणाऱ्या चाकण येथील चार सराईत गुन्हेगारांना शनिवारी (दि. 11) चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्हेगारांकडून येथील पोलिसांनी रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
तापस रंजन गिरी (वय 30, सध्या रा. बालाजीनगर, नर्मदा पार्क, मेदनकरवाडी; मूळ ओरिसा) या पाणी व कोल्ड्रिंक्स सप्लायर करणाऱ्या व्यावसायिकाने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चेतन शिवाजी राऊत (वय 26, रा. बलुतेआळी, चाकण), दिशांत अशोक केळकर (वय 22, रा. दत्त मंदिरासमोर, चाकण), सौरभ प्रशांत इंगळे (वय 19, रा. झित्राईमळा, चाकण), गणेश प्रकाश नाईक (वय 20, रा. भुजबळ आळी, चाकण) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील चेतन राऊत व गणेश नाईक या दोघांविरोधात चाकण पोलिसांत यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सोमवारी (दि. 6) रात्री चाकण नगरपरिषदेच्या शौचालयाजवळ तापस गिरी हे लघुशंका करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी हे चौघे दोन मोटरसायकलवर तेथे आले, त्यांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून आवाज करू नकोस, अशी धमकी देत गिरी यांच्या डोळ्याला पट्टी बांधून एका पोल्ट्री फार्म जवळ नेले.
त्यांच्या खिशातील रोख 15 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेऊन, तुझ्या कामगारांकडे आणखी किती पैसे आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून आणखीन पैसे मागवून घे, अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 7) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान गिरी यांना त्यांनी अज्ञातस्थळी डांबून ठेवले होते.