महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापावचं स्थान अग्रणी आहे. सामान्यांना परवडणारा आणि श्रीमंतांना आवडणारा अशी वडापावची ओळख सांगता येईल. वडापाव हा बटाटा वडा आणि पाव अशा साध्या-सोप्या कॉम्बिनेशनमध्ये खाल्ला जाणारा पदार्थ असला तरी लोकांनी वडा-पाव खाण्याच्या आपापल्या हटके पद्धती शोधून काढल्या आहेत.
अशातच आज प्रत्येकाच्या मनामध्ये नेहमीच ट्रेंडिंग असलेला वडा-पाव सोशल मीडियावर देखील चांगलाच ट्रेंडिंग झाला आहे. त्याचं झालं असं की, वडा-पाव प्रेमी असलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने आज आपल्या ट्विटर खात्यावर वडा-पाव खातानाचा फोटो शेअर केला असून त्याने कॅप्शनमध्ये, “तुम्हाला वडा पाव खायला कसा आवडतो? ? 1. चहासोबत २. चटणीसोबत 3. फक्त वडा-पाव” असा प्रश्न विचारला.
आता विषय वडा-पावचा आहे म्हंटल्यावर चर्चेत उडी घेणार नाही तो मुंबईकर कसला? अजिंक्य रहाणे याच्या या प्रश्नाला उत्तर देत सचिन तेंडुलकरने त्याला वडापाव कशासोबत खायला आवडतो याचं उत्तर दिलं आहे. सचिन म्हणतो, “मला वडा पाव थोडी लाल चटणी, थोडी हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची चटणी या चटण्यांच्या अप्रतिम मिश्रणासोबत खायला आवडतो.”
सचिनने आपलं वडापाव बाबतचं प्रेम उघड केल्यानं अनेकांनी त्याचं कौतुक केलं असून आपल्याला वडापाव कसा खायला आवडतो याबाबतही सांगितलं आहे. तुम्ही देखील आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला वडापाव खायला कसा आवडतो हे सांगू शकता.