नगर – जिल्ह्यातील चौदा पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींच्या निवडी आज,दि.7 त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी पार पडल्या. पक्षीय बलाबल बघता राष्ट्रवादीला सर्वाधिक पाच,भाजप,शिवसेना व विखे गट प्रत्येकी दोन, तर क्रांतीकारी शेतकरी पक्ष व कॉंग्रेसचा प्रत्येकी एका ठिकाणी सभापती झाला. जामखेडमध्ये वेळेत अर्ज न आल्याने तेथे उद्या, दि.8 निवड होणार आहे.
मात्र, या निवडणुका पार पडत असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. येथे कॉंग्रेसविरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. तर दुसरीकडे नगर तालुक्यात मात्र महाविकास आघाडीचा पॅटर्न नेहमीप्रमाणे राबवत सेनेला सभापतीपद, तर कॉंग्रेसला उपसभापतीपद देण्यात आले.
कोपरगाव, राहुरी, कर्जत, शेवगाव व श्रीगोंदा या पाच ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सभापती झाले आहेत. अकोले व पाथर्डीत भाजपचे सभापती झाले आहेत. राहाता पंचायत समितीत विखे गटाची सत्ता आली असली तरी ते पक्षीय कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले आहे.
संगमनेर पुन्हा थोरात गटाच्या म्हणजेच कॉंग्रेसच्या ताब्यात गेली आहे,तर नेवाशात क्रांतीकारी शेतकरी पक्षाने पुन्हा बाजी मारली आहे. पारनेरमध्ये सभापती सेनेचा,तर उपसभापती राष्ट्रवादीचा झाला आहे. नगर तालुक्यात सभापती सेनेचा,तर उपसभापती कॉंग्रेसचा झाला आहे. पारनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी सेनेचे गणेश शेळके यांची बिनविरोध तर राष्ट्रवादीच्या सुनंदा धुरपते यांची मतदानातून निवड
- कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा राहुल जगधने व उपसभापतीपदी अर्जुन भास्कर काळे यांची बिनविरोध निवड
- नगर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी सेनेच्या कांताबाई कोकाटे व उपसभापतीपदी कॉंग्रेसचे रवींद्र भापकर यांची बिनविरोध निवड
- श्रीगोंदा पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या गीतांजली शंकर पाडळे व उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्याच रजनी सिद्धेश्वर देशमुख विजयी
- राहाता पंचायत समितीच्या सभापतीपदी विखे गटाच्या नंदा तांबे व उपसभापतीपदी विखे गटाचेच ओमेश जपे यांची बिनविरोध निवड
- राहुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेबीताई सोडनर यांची व राष्ट्रवादीचेच प्रदीप भाऊ पवार यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड
- श्रीरामपुर पंचायत समितीचे सभापतीपदी विख-मुरकुटे गटाच्या संगिता नाना शिंदे यांची तर उपसभापतीपदी याच गटाच्या बंडू तोरणे यांची निवड झाली.
- पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या सुनिता गोकुळ दौंड तर उपसभापतीपदी भाजपच्याच मनिषा रवींद्र वायकर यांची निवड
- नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे रावसाहेब कागुणें तर उपसभापतीपदी याच पक्षाचे किशोर जोजार यांची बिनविरोध निवड
- शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे क्षितिज नरेंद्र घुले यांची बिनविरोध फेरनिवड तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्याच नूतन भोंगळे यांची बिनविरोध निवड
- अकोले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे दत्तात्रय बोऱ्हाडे तर उपसभापतीपदी भाजपचेच दत्तात्रय देशमुख विजयी
- संगमनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसच्या संगिता जोर्वेकर तर उपसभापतीपदी कॉंग्रेसचे नवनाथ आरगडे विजयी
- कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अश्विनी कानगुडे,तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचेच हेमंत मोरे बिनविरोध
- जामखेड पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या आजच्या होणाऱ्या निवडी रद्द. वेळेत अर्ज दाखल न झाल्याने उद्या 8 जानेवारी रोजी होणार निवडी.
महाविकास आघाडीचा 9 पंचायत समित्यांवर दावा
कोपरगाव,शेवगाव,राहुरी,श्रीगोंदा व कर्जत या पाच राष्ट्रवादीच्या,नगर व पारनेर या दोन शिवसेनेच्या,संगमनेर ही एक कॉंग्रेसच्या तर नेवासा क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या अशा एकूण नऊ पंचायत समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याचा दावा करणारे पत्रक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रसिध्दीस दिले आहे. यात अकोले व पाथर्डी भाजपला,तर राहाता व श्रीरामपूर या दोन पंचायत समित्या विखे गटाला देण्यात आल्या आहेत.