शैक्षणिक संस्थांना केंद्र सरकार करणार आर्थिक मदत : राज्यातून 40 प्रस्ताव दाखल
पुणे – नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक सहाय्य दिले जाणार असून यात शैक्षणिक संस्थांना इन्क्युबेशन सेंटर उघडण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या मदतीचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून यासाठी 40 प्रस्ताव दाखल झाले आहेत.
लघू व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे ही योजना सुरू केली जाणार आहे. अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना नवीन उद्योग काढण्यासाठी भांडवलाची मोठी अडचण येते. तसेच नवीन उद्योजकांना भांडवली मदत करण्यासाठी बॅंकाही विश्वास दाखवत नाहीत. त्यामुळे अनेक उद्योजकांना वाव मिळत नसल्याने रोजगार निर्मिती होत नाही.
त्यामुळे अशा नवउद्योजकांच्या नवीन संकल्पनांना पाठबळ देण्यासाठी लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत शैक्षणिक संस्थेला इन्क्युबेशन सेंटर उघडण्यासाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून नवीन उद्योगांना उभारी दिली जाणार आहे, असे प्रशासनाने सांगितले आहे.
इन्क्युबेशन सेंटरकडे विद्यार्थ्यांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केल्यास त्याच्या उद्योगाची चाचपणी करून त्याला केंद्र शासनाकडून 15 लाखांची मदत केली जाणार आहे. यासाठी काही अटी व शर्ती असतील. या योजनेमध्ये अभियांत्रिकी, तंत्रविज्ञान संस्था सहभाग घेऊ शकतात. तसेच उद्योगक्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनाही मदत होणार आहे.
यामुळे नवउद्योगांमध्ये पाऊल टाकू इच्छिणाऱ्या तरुणांना यातून मोठा फायदा होणार आहे. राज्यातून इन्क्युबेशन सेंटरसाठी 40 प्रस्ताव आले आहेत, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
आर्थिक मंदी कमी होण्याची शक्यता
सध्या देशभरात मंदीची लाट आहे. याचा सर्वाधिक फटका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसला आहे. वाहनविक्री व्यवसायातील घटलेली विक्री व अन्य उत्पादक कंपन्यांना मंदीमधून बाहेर काढण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची संकल्पना पूरक ठरणार आहे. नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देऊन, रोजगारनिर्मितीचा या मागील उद्देश आहे.