मुंबई : संजय लिला भन्साळींनी आपल्या “गंगुबाई काठियावाडी’या आगामी सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. गंगुबाईच्या रोलमध्ये भन्साळींनी आलिया भटची निवड केली आहे. आता हा सिनेमा पुढच्या वर्षी 11 सप्टेंबरला रिलीज करण्याच्या दृष्टीने शुटिंग सुरू झाले आहे. हुसैन झैदीच्या “माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे.
यातील गंगुबाई ही मुंबईतील एक कोठेवाली आणि स्वतःच्या बळावर या धंद्यातले स्थान मिळवलेली स्त्री आहे. या रोलमध्ये आलियाची निवड होणे थोडेसे धक्कादायक आहे. आलियाने ट्विटरवरून याबाबतची माहिती पब्लिकला दिली होती.या सिनेमासाठी आलियाने काही महिन्यांपूर्वी काठेवाडी ही बोली भाषा शिकायलाही सुरूवात केली होती.
भन्साळींच्या “इन्शाअल्लाह’मध्ये आलिया सलमानबरोबर काम करणार असे ठरले होते. पण सलमान आणि भन्साळींमधील मतभेदांमुळे हा सिनेमा बारगळला. अर्थात हे मतभेद क्रिएटिव्ह होते. पण त्यामुळे भन्साळींच्या सिनेमात काम करण्याची आलियाची ईच्छा अर्धवट राहिली.
म्हणूनच भन्साळींनी “गंगुबाई…’च्या रोलसाठी आलियाला चान्स दिला आहे, असे म्हटले तरी चालू शकेल. यातील गंगुबाईच्या रोलमध्ये आलियाचा “रफ ऍन्ड टफ’ अवतार बघायला हवा.