अत्याचार केल्याच्या अनेक तक्रारी दाखल
मुझफ्फरनगर : मला आणि माझ्या कुटुंबियांना बेदम मारहाण करून पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवून सोने आणि रोख रक्कम लूटून नेल्याची कैफीयत येथील एका लाकूड विक्रेत्याने मांडली आहे. सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधातील शुक्रवारी झालेल्या निदर्शनात हाजी हमिद हसन आणि त्यांचा मुलगा सहभागी झाले त्यानंतर पोलिसी अत्याचारांना त्यांना तोंड द्यावे लागले, असे वृत्त दि. टेलिग्राफ या दैनिकात गुरूवारी प्रकाशित झाले आहे.
माझ्या घरात सुमारे 30 पोलिस घुसले. त्यातील बरेच जण साध्या वेशात होते. त्यांनी घराची अख्खी नासधूस केली. मी रडलो, दयेची याचना केली मात्र ते खूपच हिंसक बनले होते. त्यांनी रायफलचा दस्ता आणि काठीने मारहाण केली. त्यांनी सांगितले की मुस्लिमांसाठी दोनच जागा एक पाकिस्तान किंवा कब्रस्तान, असे हसन यांनी सांगितले.
हा सगळा गोंधळ सुमारे 30-40 मिनिटे सुरू होता. सर्व उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कपाटात ठेवलेले पाच लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागीने हिसकावून घेतले. त्यांच्या नातीचा विवाह फेब्रुवारीत आहेत, त्यासाठी हे पैसे आणि दागिने जमा केले होते, असे ते म्हणाले.
हसन यांचा मुलगा महंमद शाहीद यांनाही पोलिसांनी मारहाण केली. ते त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी त्याच्या हातात गन देऊन फोटो काढून घेतला, असे हसन म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बदला घेत आहेत. माझ्या वडीलांनी जिनांचा पाकिस्तान नाकारला आणि गांधीजींचा भारत स्वीकारला. मी जन्म घेतला तो हा भारत नव्हेच, असे सांगून ते म्हणाले, या सरकारने 19 डिसेंबरला एका मिनटात आम्हाला परकं करून टाकले.
मुझफ्फरनगर आणि 12 जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात 10 दुचाकी, अनेक मोटारी पेटवून देण्यात आल्या होत्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
दरम्यान पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिस फक्त हिंसाचरात सहभागी झालेल्यांच्या घरात घुसले, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका पोलिस उपनिरीक्षकाने सांगितले.
हसन आणि त्यांचे कुटुंबीय सरवत या मुस्लिम बहुल भागात राहतात. तेथील मीनाक्षी चौक आणि कराची सडक भागात मुस्लिम समाजाची दुकाने आहेत. तेथे गेल्या आठवड्यात सुमारे 60 दुकाने सील करण्यात आली.
आणखी एक 74 वर्षीय चपलांचे घाऊक विक्रेत्यांना पोलिसांचा असाच अनुभव आला. हाजी अन्वर लाही म्हणाले, पोलिस मध्यरात्री आले. त्याच्या पेटीत अडीच लाख रुपयांची रोकड होती. ती पेटी पेटी ऊघडायला भाग पाडून ती सगळी काढून घेतली. घरातील सारे दागिने लुटून नेले.
दरम्यान, सरवत आणि खालापार भागात पोलिसांनी केलेल्या अमानुषतेबातच्या तक्रारींची आपण दखल घेतली आहे. आपण त्यात लक्ष घालत आहोत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमित सिंह यांनी सांगितले. व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या दंगलखोरांनाच केवळ अटक केली आहे, असे प्रशासन सांगत असले तरी लाही यांनाही शुक्रवारी अटक केली होती. त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ आहे. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत डांबण्यात आले.