पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
सातारा – पोलीस ठाण्यात दाखल असलेली तक्रार मागे घेण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ऍसिड हल्ला करण्याची धमकी चक्क एका पोलिसाने दिली आहे. याप्रकरणी सांगली जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी अनिल सुभाष पवार व त्याचा भाऊ सुनील (रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलीस मुख्यालयाच्या आवारातच धमकी देण्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने काही महिन्यांपूर्वी अनिल पवार याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अनिलवर कारवाई केली होती. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी अनिल हा पीडितेवर वेळोवेळी दबाव टाकत होता. त्याच्या दबावाला बळी न पडता पीडितेने तक्रार मागे घेण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या अनिलने, केस मागे घेण्यासाठी पैसे देतो, असे म्हणत, ऐकले नाही तर “अंगावर ऍसिड टाकून तुला जाळून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या पीडितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एम. के. कदम तपास करत आहेत.