जेजुरीकरांना खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही
जेजुरी- जेजुरी (ता. पुरंदर) रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या व जलद धावणाऱ्या सर्व गाड्यांना थांबा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
जेजुरी रेल्वेस्थानकावर सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी बुधवारी (दि. 18) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. जेजुरी रेल्वेस्थानक हे नवीन मॉडेल ठरणार आहे. याच धर्तीवर इतर स्थानकांवर विकास कामे करण्याची मागणी होत आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराला खंडोबा गडाच्या महाद्वाराचा आकार देण्यात आला आहे. रेल्वेस्थानकाचे नव्याने दिसणारे रुप पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
येथे झालेल्या विविध कामांच्या उदघाटनासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आराखड्याच्या कामांसाठी बैठक घेणार असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.
जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. येथे लांब पल्ल्याच्या गाडया थांबाव्यात, सोमवती पालखी मार्गासाठी भुयारी मार्ग व्हावा, रेल्वेस्थानकावरील बगीचा विकसित करावी, रेल्वेच्याकडेने सर्व्हिस रस्ता व्हावा आदी मागण्या यावेळी नागरीकांनी खा. सुळे यांच्याकडे केल्या.
कऱ्हा नदीवरील सुमारे पंचवीस ते तीस सिमेंट बंधारे पुरामुळे नादुरुस्त झाले आहेत. ते दुरुस्त करावेत अशी मागणी माणिकराव झेंडे यांनी यावेळी केली. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे, सुदाम
टेकवडे, रेल्वे समितीचे सदस्य प्रवीण शिंदे, माजी नगरसेवक मेहबुब पानसरे, नगसेविका अमिना पानसरे, माजी नगराध्यक्षा साधना दरेकर, ज्येष्ट नागरीक संघटनेचे माजी अध्यक्ष गोविंद दिडभाई, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष एन. डी. जगताप, गणेश आबनावे, रोहिदास कुदळे, संजय माने, बापू भोर आदी यावेळी उपस्थित होते.