पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत आरपीटीए गो गेटर्स, महाराष्ट्र मंडळ, एमडब्लूटीए या संघांनी विजयी सलामी दिली.
या स्पर्धेत साखळी फेरीत आरपीटीए गो गेटर्स संघाने एफसी अ संघावर 13-09 असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात कमलेश शहा, राजेंद्र देशमुख, अभिषेक चव्हाण, विक्रम श्रीश्रीमल, संजय सेठी, अर्पित श्रॉफ यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र मंडळ संघाने पीवायसी ग संघाचा 18-01 असा एकतर्फी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली.
तिसऱ्या सामन्यात एमडब्लूटीए संघाने पीवायसी ब संघाला 18-05 असे पराभूत केले. एमडब्लूटीए संघाकडून निलेश ओस्वाल, जयदीप वाकणकर, आशिष मणियार, राजेश मंकणी, विवेक खांडगे, अभिषेक ताम्हाणे यांनी सुरेख कामगिरी बजावली.