शेवटच्या दोन वर्षांत भाजप देणार 20 जणांना संधी
पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीसाठी भाजपमधील जवळपास प्रत्येक सदस्यांकडून मागणी करण्यात येत आहे. मात्र, हे सदस्यपद प्रत्येकी दोन वर्षांसाठी असल्याने काही ठराविक नगरसेवकांना पक्षाला या समिती सदस्यपदी संधी देता येते. त्यामुळे पुढील दोन वर्षे स्थायी समितीमधील सदस्यांना प्रत्येकी एकच वर्ष पद देण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आला. मार्च 2020 पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील वर्षी समितीमध्ये दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या सदस्यांसह एक वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांनाही राजीनामा द्यावा लागणार आहे.
महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे सुमारे 99 नगरसेवक आहेत. त्यातच भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने सर्व विषय समित्या, तसेच स्थायी समितीमध्ये महापालिकेचे बहुमत आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्ष आणि 6 समित्यांची अध्यक्ष अशी सातच पदे प्रत्येकवर्षी बदलली जातात. त्यातच, स्थायी समितीत असलेल्या सदस्यांना 2 वर्षे संधी असते. त्यामुळे काही ठराविक सदस्यांनाच स्थायी समिती तसेच इतर समित्यांच्या अध्यक्षपदाची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकच नगरसेवकाकडून स्थायी समितीमध्ये वर्णी लावण्यासाठी धडपड केली जात आहे. मात्र, दोन वर्षांनंतर सदस्य बदलले जात असल्याने प्रत्येकाला संधी देणे शक्य होत नाही. त्यातच, महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक नगरसेवक स्थायी समिती तसेच इतर समित्यांची आश्वासने घेऊन पक्षात आली आहेत.
त्यामुळे त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यात पक्षाला अडचणी येत आहेत. त्यातच, महापालिका निवडणुका अवघ्या दोन वर्षांवर आल्याने या नाराजांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी समिती सदस्यपद न दिले गेल्यास त्याचा फटका पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षांत भाजपकडून समितीमध्ये असलेल्या सदस्यांना प्रत्येकी एका वर्षासाठीच स्थायी समितीचे पद दिले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
समिती अध्यक्षांबाबत अद्याप निर्णय नाही
विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे समितीमधील हे पहिलेच वर्ष आहे. तर त्यांना या वर्षात 3 महिन्यांसाठी सदस्यपद देण्यात आले आहे. त्याचवेळी पक्षाकडून पुढील वर्षापासून समिती सदस्यांना एकाच वर्षाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर रासने यांना पक्षाने 14 महिन्यांसाठी संधी दिली आहे. त्यामुळे रासने हे पुढील वर्षीही स्थायी समिती अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे उर्वरित 9 सदस्यांचे राजीनामे मार्च महिन्यात निश्चित असले तरी रासने यांच्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.