चर्चेला पुरेसा वेळ मिळत नसल्याने सदस्यांची मागणी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने अनेक प्रश्न, इतर विषय चर्चेला येतात. पण, विद्यापीठाची अधिसभा केवळ एकदिवस होत असल्याने चर्चेला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ही अधिसभा किमान दोन दिवस व्हावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली. त्यावर राज्यपाल कार्यालयात यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले.
विद्यापीठाची अधिसभा शनिवारी झाली. त्यात स्थगन प्रस्ताव, ठराव, प्रश्नोत्तरे यासह कुलगुरूंचे भाषण, त्यावरील प्रश्न, लेखापरीक्षण अहवाल व त्यावरील प्रश्न यावर चर्चा झाली. मात्र, जास्त चर्चा न करता प्रस्ताव, प्रश्नांवर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चर्चा करून त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ असे प्रशासनाकडून सांगितले जात होते.
चर्चेला मिळणार अपुरा वेळ यावर सदस्य अमित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. “अन्य विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठाअंतर्गत अनेक महाविद्यालये येतात. याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे यावर चर्चा करताना वेळ कमी पडतो. तसेच नाशिक, नगर येथून सदस्य येतात. त्यामुळे अधिसभा केवळ एक दिवस न ठेवता दोन दिवसांची घ्यावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
अधिसभेचे कामकाज राज्यपाल कार्यालयातून निश्चित होते. यात चर्चेसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि दोन दिवस बैठक व्हावी, यासाठी राज्यपालांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू