शेवगा “जैसे थे’, तर मेथी झाली स्वस्त
पिंपरी – गेल्या आठ दिवसांपासून भाज्याची आवक वाढल्याने भाजी पाल्याच्या दरात घसरण झाली आहे. परिणामी मटार, टॉमेटो, काकडी व हिरव्या पालेभाज्या स्वस्त झाल्या आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शंभरीपार गेलेल्या कांद्याच्या भावात काहीसी घसरण झाली आहे. मात्र, अद्यापही सरासरी 80 ते 100 रुपयांच्या आसपास कांद्याचे भाव आहेत. तर दुसरीकडे पालेभाज्यांचे दरही घसरले असून, मेथी अगदी किरकोळ भावात विक्री झाली. दर कमी झाल्याने या रविवारी भाजीपाला खरेदीसाठी पिंपरी भाजी मंडई गजबजली होती.
या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यापासून कांद्याच्या दरवाढीने नागरिकांना रडविले होते. याचा परिणाम म्हणून कांदा खरेदीत मोठी घट झाली होती. त्यावर उपाय म्हणून बाजारात परदेशातून कांदा मागविण्यात आला होता. मात्र, रविवारी कांद्याचे दर गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत काहीसे कमी झाले होते. तरीही जुन्या कांदाचे दर अद्याप शंभरीवर आहे. तर शेवगा बाजारात दुर्मिळ दिसत असून, कमालीचा भाव खात आहे. दुसरीकडे, बटाट्याचे दरात किचिंत वाढ झाली आहे.
अलिकडच्या काळात टॉमेटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने 20 रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर, काकडी आणि मटाराचे दर घसरले होते. काकडी 30 रुपये दराने विकली जात होती. हिवाळ्यात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे कोणतीही पालेभाज्याची जुडी दहा रुपयाला विक्री केली जात होती. तर मेथीची विक्री अगदीच किरकोळ भावात म्हणजे 15 रुपयाला दोन-तीन जुड्या विकल्या जात होत्या. मुळा किंचित वाढला असल्याने 20 रुपयाला विक्री झाली. आवक जादा झाल्याने बाजारात चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला स्वस्त दरात मिळत होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी पिंपरी भाजी मंडईत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हिरवा हरभरा, तुरीच्या शेंगा बाजारात दाखल
हिवाळ्यात खास हिरवा हरभरा व तुरीच्या शेंगाची ग्राहक वाट पाहतात. बाजारात हरभरा जुडी आणि तुरीच्या शेंगा दिसू लागल्या आहेत. हरभरा जुडी 15 रुपयाला तर तुरीच्या शेंगा व हरभऱ्याचे पाने विक्रीस आले होते.
भाजीपाला विक्रीचे दर (प्रतिकिलो) –
शिमला मिरची : 50 ते 60, पडवळ : 50, दुधी भोपळा : 40, लाल भोपळा : 25, काकडी : 30 ते 40, चवळी : 50, काळा घेवडा : 70, तोंडली : 60, गाजर : 70, वाल : 60, राजमा : 50, मटार : 30 ते 40, कारली : 50, पावटा : 50 ते 70, लिंबू : 250 (शेकडा). तर, कोथिंबीर : 10, मेंथी : 8 ते 10, शेपू : 10, पालक : 10, मुळा : 20, तांदुळजा : 10, पुदिना : 5, बटाटे : 25 ते 30, कांदे : 80 ते 100, टोमॅटो : 20 ते 30, गवार : 70, दोडका : 60 ते 70, घोसाळी : 50 ते 60, लसूण : 120, आले : 70 ते 80, भेंडी : 40 ते 50, वांगी : 30 ते 50, कोबी : 40 ते 50, फ्लॉवर : 40 ते 50, शेवगा : 180 ते 200, हिरवी मिरची : 40 ते 50.