जानेवारी महिना आला की, अनेकांना गुंतवणुकीद्वारे करसवलत मिळवण्याचे वेध लागतात. कारण आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपणार असते. विम्याच्या हप्त्यावर प्राप्तीकर कायदा 1961 मधील 80 सी कलमानुसार दीड लाखापर्यंतच्या प्राप्तीवर सवलत मिळू शकते. अर्थात विम्याचे हप्ते भरण्यासाठी रोखीची चणचण जाणवते. त्यामुळेच एलआयसीने त्यांच्याकडील विमा पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.
अर्थातच क्रेडिट कार्डचा वापरास चालना देण्याच्या उद्देशाने एलआयसीने हे पाऊल उचलले आहे. 1 डिसेंबरपासून जुन्या विमा पॉलिसीवरील किंवा नव्या पॉलिसीवरील हप्ता क्रेडिट कार्डद्वारे भरता येणार आहे. त्याचबरोबर विमा पॉलिसीवर घेतलेल्या कर्जाचा हप्ता, व्याजदेखील क्रेडिट कार्डद्वारे भरता येणार आहे. त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही. अशा पद्धतीने हप्ता भरण्यासाठी एलआयसी डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी.