तुम्ही बॅंकेतील लॉकर वापरत असाल तर रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार तुम्ही वर्षातून एकदा तरी तो उघडला पाहिजे अन्यथा बॅंक तो दुसऱ्या ग्राहकाला देऊ शकते. बॅंकेच्या वर्गवारीनुसार तुम्ही दर कमी जोखमीच्या वर्गात मोडत असाल तर यासाठी बॅंक तुम्हांला अधिक वेळ देऊ शकते. जे मध्यम जोखमीच्या वर्गात मोडतात त्यांनी तीन वर्षात लॉकरचा वापर केलेला नसेल तर रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार बॅंक त्या ग्राहकाला नोटीस पाठवेल.
ग्राहकांचा आर्थिक किंवा सामाजिक स्तर, त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप, ग्राहकाचे निवासाचे ठिकाण अशा अनेक निकषांचा विचार करून कमी ते जास्त जोखीम अशी वर्गवारी बॅंका करू शकतात. व्यक्तीला लॉकर देण्यापूर्वी बॅंकेने त्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया राबवणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर लॉकरचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना लॉकरचा वापर करावा किंवा तो बॅंकेकडे परत करावा अशा आशयाची नोटीस बॅंक पाठवू शकते. लॉकरचा वापर न करण्याचे कारण लेखी स्वरुपात बॅंक मागवू शकते.