माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का?

कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग कंपनीतील लाखो डिमॅट खात्यांमधील गैरव्यवहारामुळे शेअर बाजारातील सर्वसामान्य किरकोळ गुंतवणूकदारांच्या मनातील विश्वासाच्या भावनेला तडा गेला आहे. त्यामुळेच तुमचे डिमॅट खाते ज्यांच्याकडे आहे अशा ब्रोकरवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कार्व्हीकडे ज्यांची डिमॅट खाती आहेत त्यांच्या खात्यातील शेअर स्वतःच्या डिमॅट खात्यात वळते करून ते गहाण ठेवून कार्व्हीने त्यावर कर्ज उचलले असल्याची बाब उघड झाली आहे. सिक्‍युरिटीज अँड एक्‍सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) तातडीने पावले उचलून कारवाई केली आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) कार्व्हीचा ब्रोकर म्हणून काम करण्याचा परवाना रद्द केला आहे.
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यापुढे स्वतःचे डिमॅट खाते आणि ब्रोकरबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. अधूनमधून डिमॅट खात्यातील शेअरची संख्या तपासणे आवश्‍यक बनले आहे.

म्युच्युअल फंडाबाबत विचार केला तर म्युच्युअल फंडांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो. गरज निर्माण झाल्यावर गुंतवणुकीतून बाहेरही पडत असतो. आपला व्यवहार हा आपल्यामध्ये व म्युच्युअल फंड कंपनीमध्ये झालेला असतो. किंबहुना म्युच्युअल फंडाच्या विशिष्ट योजनेशी व्यवहार झालेला असतो, ज्यामध्ये आपण गुंतवणूक केलेली असते. नुकतेच कार्व्ही स्कॅम समोर आले आहे. ही बाब उघड झाल्यावर अनेक गुंतवणूकदारांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, आपली गुंतवणूक नक्की सुरक्षित आहे का? याबाबत म्युच्युअल फंड कंपन्यांनी खुलासा केलेला आहे.
सामान्यतः फार क्वचितवेळा अशाआर्थिक गुन्हा घडण्याची शक्‍यता असते. कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग ही स्टॉक ब्रोकर म्हणून काम करणारी संस्था आहे. त्यांचे जवळपास 12 लाख ग्राहक भारतभर आहेत. या प्रत्येक ग्राहकाचे डिमॅट आणि ब्रोकिंग अकाऊंट कार्व्हीकडे असल्याने ही कंपनी या ग्राहकांसाठी शेअरची खरेदी व विक्री करत असते. या सर्वांसाठी कार्व्हीने पॉवर ऑफ अटर्नी ग्राहकाकडून घेतलेली असते. यामुळे ग्राहकाच्या खात्यात शेअर जमा करणे किंवा विकणे याचा अधिकार कार्व्ही स्टॉक ब्रोकिंगला मिळालेला असतो.

सेबीने केलेल्या चौकशीनुसार कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग कंपनी किंवा याचठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांनी जाणीवपूर्वक पैशाचा अपहार केला आहे. कार्व्हीने स्वतःच्या नावाचे डिमॅट खाते उघडले (ग्राहकाचे असते त्याप्रमाणे) आणि नवीन डिमॅट खात्याची माहिती त्यांनी नॅशनल स्टॉक एक्‍सेंजला दिलेली नव्हती. कार्व्हीने ग्राहकांकडून घेतलेली पॉवर ऑफ अटर्नी वापरून त्याच्या खात्यात असणारे शेअर आपल्या डिमॅट खात्यात वळते केले. त्यानंतर या खात्यातील ग्राहकांच्या मालकीचे हे शेअर स्वतःच्या मालकीचे असल्याचे भासवून बॅंका आणि वित्त संस्थांकडे गहाण ठेवले व त्यावर कर्जे उचलली. या आर्थिक गुन्ह्याकडे निश्‍चितच अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे लक्षात घेऊन सेबीने त्वरेने कारवाई केलेली आहे. सेबीने 22 नोव्हेंबर रोजी आदेश काढून कार्व्हीच्या डिमॅट खात्यातील सर्व शेअर मूळ मालकांच्या खात्यावर वळते करण्यास सांगितले. साधारणतः एक लाख ग्राहक या प्रकारात भरडले गेले असण्याची शक्‍यता आहे. त्यापैकी 85 हजार ग्राहकांना आपले शेअर परत मिळाले आहेत. डिपॉझिटरी म्हणून काम करणाऱ्या संस्था (एनएसडीएल, सीडीएसएल) यांच्याकडेही सेबीने चौकशी सुरु केली आहे. प्राथमिकदृष्ट्‌या सदर आर्थिक गुन्हा डिजिटल ट्रान्झॅक्‍शन वाढल्याचा फायदा घेऊन झाला आहे.

दैनंदिन व्यवहारात आपल्या घराची सुरक्षितता करण्यासाठी आपण मजबूत कुलूप व कडीकोयंडा लावत असतो. परंतु नवनवीन डिजिटल व्यवहारात काय काळजी घ्यावी याचे ज्ञान व मार्गदर्शन सामान्य नागरिकांना नसते. भारतात वेगाने मोबाईलचा वापर वाढत आहे. सामान्य माणूस आज स्मार्टफोन वापरत आहे. अनेकदा मोबाईलवरून वेगवेगळ्या ऍपद्वारे आर्थिक व्यवहार केले जात असत ाना आपली कशाप्रकारे आर्थिक फसवणूक केली जात आहे हे गुंतवणूकदारांना कळत नाही. अशा प्रकारच्या डिजीटल व्यवहारात स्वतःचे संरक्षण कसे करावे व आर्थिक गुन्हेगारांपासून स्वतःला कसे वाचवावे हे समजावून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूदारांच्या दृष्टीने कार्व्हीच्या या गैरव्यवहारात कोणतेही नुकसान झालेले नाही. सेबीच्या चौकशीनुसार कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग कंपनीने अनेक हजार कोटींचे शेअर्स (जे त्यांच्या गुंतवणूकदारांचे होते.) ते परस्पर बॅंकांमध्ये गहाण ठेवून निर्माण झालेल्या रकमेची गुंतवणूक रिअल इस्टेट व्यवसायात केली.

म्हणजेच आपण ठेवलेल्या डिमॅट खात्यावर असणारे शेअर्स व म्युच्युअल फंड युनिटस्‌ सुरक्षित आहेत का? आपल्या नावावर असणारे शेअर व म्युच्युअल फंडातील युनिटस्‌ ब्रोकरने परस्पर विकले तर विक्रीतून आलेले पैसे इतर ठिकाणी वापरले तर असा खूप मोठा धोका आपल्या गुंतवणुकीला निर्माण होऊ शकतो. शेअरच्या खरेदीविक्रीमध्ये आपले शेअर आपल्या ब्रोकरकडे डिमॅट खात्यावर जमा असतात. अनेक वेळा आपण ते सातत्याने तपासतही नाही. यामुळेच सदर आर्थिक गुन्हा खूप उशीरा उघडकीस येतो. म्युच्युअल फंडातील व्यवहार गुंतवणूकदार व त्याच्या योजनेमध्ये असल्याने गुंतवणूकदाराचा पैसा थेट त्याच्या खात्यातून योजनेच्या खात्यात जात असतो व परत येताना तो योजनेच्या खात्यातून गुंतवणूकदाराच्या खात्यात जात असतो. या व्यवहारात कुणीही मध्यस्थ नसल्याने व्यवहार सुरक्षित राहतो. कार्व्ही ही म्युच्युअल फंडाची फक्त व्यवहार सांभाळणारी तसेच खरेदी-विक्री, लाभांश, बोनस यांची माहिती ठेवणे इतपतच मर्यादित असल्याने गुंतवणूकदाराच्या पैशाला धोका नाही.

– संदीप भूशेट्टी (गुंतवणूक तज्ज्ञ व आर्थिक सल्लागार)

Leave A Reply

Your email address will not be published.