मागील आठवड्यात अंदाज वर्तवल्याप्रमाणं रिझर्व्ह बॅंकेनं यंदा व्याजदरात कपात केली नाही मग कारण कोणतेही असो, महागाईचा दर चढा अथवा व्याजदर कमी करूनसुद्धा वृद्धीदर घसरत चालल्यामुळं देखील असेल. त्यामुळं गेल्या आठवड्यात राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50 हा 134.55 अंशांनी तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 348.66 अंशांनी घसरला. गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेनं व्याजदराच्या बाबतीत जैसे थे पवित्रा आजमावल्यानंतर भारताच्या जीडीपीची वाढ ही 6.1 टक्क्यांवरून 5 टक्के राहील अशा अनुमानानंतर बाजारात नफेखोरी दिसून आली.
तर कंझ्युमर कॉन्फिडन्स इंडेक्स खालावण्याची भिती व रिझर्व्ह बॅंकेच्या व्याजदराबाबतच्या निर्णयावर फिक्कीनी दर्शविलेली नाराजी आणि जोडीला शुक्रवारी जर्मनीमधील औद्योगिक उत्पादनातील घट मागील महिन्यातील घट दर्शवणाऱ्या इंडेक्सपेक्षा 1 टक्क्यांनी अधिक आल्यामुळं त्याचे पडसाद आपल्या बाजारातदेखील उमटले व त्यामुळं आठवड्याच्या शेवटी बाजारातील उत्साह कायम राहू शकला नाही. तांत्रिक आलेखावर पुन्हा निफ्टीस 12150 हा उर्ध्व बाजूस मोठा अडथळा ठरताना दिसत आहे तर खालील बाजूस, निफ्टीसाठी 11800 व 11700 या पातळ्यांची चाचपणी होतेय का हे या आठवड्यात कळेलच.