महामंडळाच्या भाडेतत्वावरील सेवेच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह
कापूरहोळ – शिंदेवाडी (ता. भोर) येथील दरीत शिवशाही बस कोसळून झालेल्या अपघातानंतर या सेवेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहे. परिवहन महामंडळाची सेवा तोट्यात असताना शिवशाही सारख्या खासगी बसेस भोडतत्वावर घेवून भांडवलदारांचे खिसे भरण्याचे काम परिवहन महामंडळाचे मंत्री, पदाधिकारी करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
एसटी कर्मचारी आणि शिवशाही सेवेत काम करणाऱ्यांमध्ये कायमच खदखदीचे वातावरण राहिलेले आहे. यात सेवा देताना विनाकारण वेगाची स्पर्धाही एसटी आणि शिवशाही बसच्या चालकांमध्ये पहायला मिळत आहे. शिंदेवाडी येथील घाट उतारावर झालेला अपघात अशातूनच झाला आहे का? याबाबत चर्चा आहे. परिवहन महामंडळ एसटी चालक, वाहकांवर शिवशाहीच्या माध्यमातून बेरोजगारीची कुऱ्हाड घालत असल्याचा आरोप पूर्वीपासूनच होत आहे.
शिवशाही पूर्णत: खासगी बससेवा प्रवाशांवर लादली गेली आहे. याच कारणातून एसटी कर्मचाऱ्यांकडूनही शिवशाहीला अंतर्गत विरोधच आहे. शिवशाही सेवेतून महामंडळ खड्डयात चालल्याचे उघडपणे दिसत असताना परिवहन महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा सूर एसटीच्या चालक, वाहकात आहे.
पुण्यातील स्वारगेट सारख्या बसस्थानकात विना वाहक, विना थांबा शिवशाही बसमध्ये जाण्यास काहीजणच उत्सुक असतात, अशा स्थितीतही बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेसमध्ये शिवशाही बसची संख्या अधिक असल्याचे समजते. प्रवाशांची संख्या कमी असतानाही अशा बसेस महामार्गावरून सुसाट पळविल्या जात आहेत. विनावाहक असल्या तरी अशा बसेसमध्ये मधल्या रस्त्यातूनच प्रवासी घेतले जात असल्याच्याही तक्रारी पुढे येत आहेत. खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांशी स्पर्धा करण्याकरीताही शिवशाही बसेस महामार्गावरून वेगाने दामटल्या जात आहेत.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी तर शिवशाही बसेस रिकाम्याच धावत असल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळाले आहे. बसमध्ये अवघे चार ते पाच प्रवासी असतानाही हजारो रूपयांचे डिझेल जाळून ही सेवा कशासाठी आणि कोणासाठी? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे.
शिवशाही बसेस सर्वसाधारणत: सरासरी 18 रूपये किमी या दराने महामंडळाने भाडेतत्त्वाने घेतलेल्या असल्याचे सांगितले जाते. यामुळे या बस रिकाम्या धावल्या तरी किमी प्रमाणे बस मालकांना महामंडळ पैसे मोजत असेल तर केवळ बस पळवा आणि किमी वाढवा, असे धोरण राबविले जात असेल तर महामंडळ यातून खड्यातच जाणार असल्याचे बोलले जाते.