6 डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता
पुणे – विधानसभेची आचारसंहिता संपली, दिवाळीचा मुहूर्तही गेला; परंतु अद्याप जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे येत्या 6 डिसेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ही अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना अजून दहा दिवस वाट पहावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेची डीबीटीची योजना म्हटल्यावर तिचा बट्टयाबोळ होणार हे ठरलेलेच आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला डीबीटी योजनेची प्रक्रिया संपली असे कधी होतच नाही. मात्र, त्याचा फटका शेतकरी आणि महिला लाभार्थ्यांना बसतो. दोन वर्षांपूर्वी तब्बल दहा महिन्यांनी लाभार्थ्यांची यादी जाहीर करून मार्च अखेरपर्यंत अनुदान वाटपाचे काम सुरू होते. तर गतवर्षी लाभार्थ्यांची यादी लवकर जाहीर झाली. मात्र, अनुदान मार्च अखेरीलाच मिळाले. यंदाही दिवाळीपूर्वी महिला व बालकल्याण, समाजल्याण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाकडून लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करू असे अश्वासन संबधित विभागप्रमुखांकडून देण्यात आले.
मात्र, आचारसंहितेचे कारण देत विभागप्रमुखांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले. मात्र, दिलेल्या वेळेत यादी जाहीर करतील तर ते अधिकारी कसे काय? याप्रमाणे नोव्हेंबर महिना संपत आला तरीही यादी जाहीर झालेली नाही.
अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ होणार
ही यादी जाहीर झाल्यानंतर अधिकारी आणि लाभार्थी यांच्याकडे केवळ चार महिने राहणार आहेत. त्यामध्ये यादी प्रसिद्ध करणे, लाभार्थ्यांनी वस्तू खरेदी करून त्याची बिल पंचायत समितीला सादर करणे. त्यानंतर योजनेचे अनुदान जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती स्थरावर वर्ग करून प्रत्यक्षांना लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. त्यामुळे यंदाही योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ होणार हे निश्चित.