पडद्यावर ऐकायला मिळणारे संवाद अनेकदा त्या कलाकाराच्या प्रत्यक्ष आवाजाशी विसंगत असल्याचे दिसतात. काही वेळा एखाद्या ऍनिमेशनपटातील आवाज एखाद्या हुबेहूब कलाकारासारखा वाटतो. असे का हा प्रश्न अनेकांना पडत असतो. याचे कारण असते व्हॉइसओव्हर. हिंदी चित्रपटांमध्ये हे प्रमाण कमी असलं तरी ऍनिमेशन पटांचा पायाच व्हॉइसओव्हर हा आहे. गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व्हॉइसओव्हरच्या माध्यमातून आपला आवाज देऊन कमाईही करत आहेत. त्यातून त्यांनी एक नवी ओळखही तयार केली आहे.
गेली नऊ वर्षे बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या परिणिती चोप्राने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले. मात्र, तिच्या कितीतरी वर्षे आधीपासून या बॉलीवूड जगतात तिची बहीण प्रियंका चोप्रा कार्यरत आहे. यशाच्या उच्च शिखरावर प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते; परंतु एवढ्या मोठ्या अभिनय कारकिर्दीत दोघी बहिणींनी कधीही एकत्र काम केलेले नाही. मात्र, तो योग आता जुळून आला आहे. “फ्रोझन 2′ या हॉलीवूडच्या ऍनिमेशन पटात दोघींना एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटात परिणिती “ऍना’ व प्रियंका ही “एल्सा’ अशा दोन बहिणींच्या भूमिका दोघी साकारणार आहेत. पण चाहत्यांनो, जरा थांबा. तुम्ही समजता तसे नाही आहे. या चित्रपटात या दोघी बहिणी कुठेही दिसणार नाही आहेत, तर यात त्यांचा केवळ आवाज ऐकू येणार आहे. या ऍनिमेशन चित्रपटात परिणिती “ऍना’साठी, तर प्रियंका “एल्सा’ हिच्यासाठी आपला आवाज देणार आहे. रिअल लाइफमधील बहिणी आता रील लाइफमधील बहिणींना आवाज देणारे एक वेगळे उदाहरण बॉलीवूडच्या इतिहासात आता पाहायला मिळणार आहे.
अनुभवी प्रियंका
विषय हा नाही की, बॉलीवूडमधील दोन अभिनेत्री हॉलीवूडच्या ऍनिमेशन सिनेमासाठी व्हॉइसओव्हर करीत आहेत. कारण याआधीही बॉलीवूडच्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी हॉलीवूडसाठी व्हॉइसओव्हर केलेले आहेत. या दोन बहिणींमध्ये प्रियंकाने यापूर्वी काही हॉलीवूड चित्रपटांसाठी व्हॉइसओव्हर केलेले आहे. मात्र, परिणिती या क्षेत्रात नवीन आहे. पूर्वी बॉलीवूडमधील कलाकार हा प्रकार करणे टाळायचे. मात्र, आता अनेक दिग्गज कलाकार हॉलीवूड चित्रपटांतील लाइव्ह अथवा ऍनिमेटेड पात्रांसाठी व्हॉइसओव्हर करू लागले आहेत.
प्रियंकाचा हिंदी आणि इंग्रजी व्हॉइसओव्हर
22 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “फ्रोझन-2′ ऍनिमेशन पटातील “एल्सा’ या पात्रासाठी आवाज देणाऱ्या प्रियंकाच्या नावावर अनेक रेकॉर्डस् आहेत. तीच एक अशी अभिनेत्री आहे, जिने हॉलीवूड चित्रपटांत इंग्रजीमध्येही व्हॉइसओव्हर केले आहे. तिने इंग्रजीत म्हटलेल्या गाण्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. तेव्हापासूनच तिला हॉलीवूडच्या चित्रपटांत व्हॉईसओव्हर करण्याची संधी मिळू लागली. 2013 ला प्रदर्शित झालेल्या ऍनिमेटेड स्पोर्टस कॉमेडी सिनेमामध्ये तिने इंग्रजीमध्ये पहिल्यांदा व्हॉइसओव्हर केला. या चित्रपटात भारतीय विमान असलेल्या “ईशानी’ या पात्रासाठी प्रियंकाचा आवाज वापरण्यात आला होता. यानंतर प्रियंकाने “द जंगल बुक’ आणि आता “फ्रोझन-2′ या चित्रपटांसाठी तिने व्हॉइसओव्हर केला आहे.
या अभिनेत्यांनी केला आहे “व्हॉइसओव्हर’
बॉलीवूडच्या कलाकारांनी हॉलीवूड चित्रपटांसाठी व्हॉइसओव्हर करणे आता सामान्य बाब आहे. हॉलीवूडच्या हिंदीत भाषांतरित झालेल्या अनेक चित्रपटांत बॉलीवूडच्या कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. खूप थोड्या लोकांना माहीत असेल की, 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या “ऍव्हेंजर : डार्क ऑफ द मून’ या हॉलीवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटासाठी अक्षयकुमारने व्हॉइसओव्हर केला आहे. त्याचप्रमाणे मार्व्हल कॉमिक्सच्या पुस्तकातील “कॅप्टन अमेरिका’ या पात्रावर आधारित “कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर’ या चित्रपटात स्टीव्ह रॉजर्स ऊर्फ कॅप्टन अमेरिका या मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता क्रिस इवॉन्स याच्यासाठी वरुण धवनचा आवाज वापरण्यात आला आहे. तसेच “पाइरेट्स ऑफ द कॅरेबियन’च्या मालिकेतील “डेड मेन टेल नो टेल्स’ या पाचव्या चित्रपटात “मुन्नाभाई’फेम आर्शद वारसीने आपला आवाज दिला आहे.
आपल्याला हे माहीतच आहे की, याआधी नाना पाटेकर यांनी “जंगल बुक’मध्ये शेरखान या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे. तसेच “आइस इज कलिजन कोर्स’ या हॉलीवूड पटात अर्जुन कपूरचा, तर “द ऍमेझिंग स्पायडरमॅन-2’मध्ये विवेक ओबेरॉयचा आवाज वापरण्यात आला आहे.
व्हॉइसओव्हरशी संबंधित मनोरंजक तथ्य
गेल्या काही दशकांपासून हॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये बॉलीवूड कलाकारांचा आवाज वापरण्याचा प्रकार सुरू आहे. हा व्हॉइसओव्हरचा प्रकार तेवढाचा रोचकही आहे. हॉलीवूड चित्रपट “मलेफिसेंट : मिस्ट्रेस ऑफ इव्हिल’मध्ये मलेफिसेंट या वाईट राणीची भूमिका अँजेलिना जोली या आघाडीच्या अभिनेत्रीने साकारली आहे. या अँजेलिना जोलीसाठी विश्वसुंदरी असलेली बॉलीवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा आवाज वापरण्यात आला आहे. यामुळे काही काळापासून चाहत्यांपासून दूर गेलेली ऐश्वर्या पुन्हा एकदा चर्चेत आली. व्हॉइसओव्हरशी संबंधित असे बरेच मनोरंजक किस्से आहेत.
टायगर श्रॉफचे “स्पायडरमॅन’प्रेम
स्पायडरमॅनचे सर्वच चाहते आहेत. त्यात टायगर श्रॉफ अपवाद कसा काय ठरू शकतो? तोही प्रचंड स्पायडरमॅनप्रेमी आहे. काही वर्षांपूर्वीच येऊन गेलेल्या “फ्लाइंग जट’ या चित्रपटात टायगर श्रॉफला सुपरमॅन बनण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या “स्पायडरमॅन : होमकमिंग’च्या हिंदी भाषांतरित चित्रपटातील मुख्य भूमिकेच्या व्हॉइसओव्हरसाठी टायगरचेच नाव पुढे आले. या चित्रपटातील स्पायडरमॅनचे डबिंग करणे म्हणजे त्याच्यासाठी बालपणातल्या आठवणी जागविण्यासारखे आहे. स्पायडरमॅनचे कारनामे बघतच तो मोठा झाला. तो म्हणतो, “”या चित्रपटात स्पायडरमॅनसाठी आवाज देणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्न खरे झाल्यासारखेच आहे.”
सोनम परब