महान गणित तज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायॉपिक सध्या चर्चेत आहे. यात विद्या बालन ही शकुंतलाची भूमिका साकारत असून त्याचा लुक नुकताच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात विद्याच्या मुलीची भूमिका अभिनेत्री सान्या मल्होत्रा साकारत असून चित्रपटातील आणखी एक नाव समोर आले आहे.
अभिनेता अमित साध असे ते नाव असून त्याने “काय पो छे’, “गोल्ड’ आणि “सुलतान’ यासारख्या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखविली आहे. शकुंतला देवीच्या बायॉपिकमध्ये अमित हा विद्या बालनच्या जावईची भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाबाबत अमित साध म्हणाला, जेव्हा मी या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला शकुंतला देवी यांच्याबाबत खूप काही समजले. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच उत्साही आहे. या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस पडेल, असे त्याने सांगितले.
दरम्यान, शकुंतला देवी या महान गणित तज्ज्ञ होत्या. त्यांची बुद्धी इतकी प्रखर होती की त्यांना “मानव कॉम्प्युटर’ म्हणून ओळखले जायचे. या चित्रपटात बांग्ला अभिनेता जिशु सेनगुप्ता हे विद्याच्या पतीच्या भूमिकेत दिसतील. हा बायॉपिक पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.