“ओडीएफ प्लस’ सर्वेक्षणात पालिका नापास
पुणे (सुनील राऊत )- देशातील स्वच्छ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळविण्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या महापालिका प्रशासनाला चांगलाच धक्का बसला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत शहराचे स्टार रेटिंग जाहीर करण्यासाठी पालिकेस शहर हागणदारी मुक्त (ओडीएफ प्लस) असल्याचा दर्जा मिळविणे बंधनकारक होते. मात्र, या
स्पर्धेत महापालिका नापास झाल्याने हे रेटिंग मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 2020 चे
सर्वेक्षण संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असतानाच पालिका या स्पर्धेतून बाहेर फेकली जाणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शहरांच्या स्वच्छतेचे रॅकिंग ठरविण्यात येते. या स्पर्धेत पहिले तीन वर्षे पहिल्या दहा शहरांमध्ये असलेल्या पुण्याचे 8 मानांकन 2019 मध्ये थेट 37 वर गेले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 2020 साठी कंबर कसत जानेवारीपासूनच जय्यत तयारी केली होती. त्यात वेगवेगळ्या स्पर्धा, जनजागृती, अधिकाऱ्यांचा समावेश करून शहर स्वच्छतेवर भर देण्याचे उपक्रम पालिकेने हाती घेतले होते. मात्र, स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास शहराचे स्टार रेटिंग आवश्यक आहे.
त्यासाठी शहर हगणदारी मुक्त बंधनकारक असून त्यातही “ओडीएफ प्लस’, “ओडीएफ प्लस प्लस’ असा दर्जा असणे आवश्यक आहे. त्या अंतर्गत पालिकेने या वर्षी “ओडीएफ प्लस’ दर्जासाठी केंद्राकडे अर्ज केला होता. त्या अंतर्गत सुमारे 1,224 सर्वाधिक चांगल्या व अत्याधुनिक सुविधा असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी सुमारे 25 टक्के स्वच्छतागृहांची तपासणी केंद्राच्या पथकाकडून मागील महिन्यात करण्यात आली. यात स्वच्छतागृहांत वेगवेगळे 53 निकष पूर्ण असणे आवश्यक होते. मात्र, अनेक ठिकाणी हे निकष पूर्ण न झाल्याने या पथकाने पालिकेस “ओडीएफ प्लस’ दर्जा दिला नाही. परिणामी, महापालिकेस शहराचे स्टार रेटिंग करणे शक्य नाही. त्यामुळे पालिका आपोआपच स्वच्छ शहरांच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याचे चित्र आहे.
पुन्हा अर्ज करणार
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा डिसेंबर 2019 पर्यंत आहे. त्यामुळे महापालिकेकडून 30 नोव्हेंबरच्या आत पुन्हा केंद्राकडे “ओडीएफ प्लस’ दर्जा मिळविण्यासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. या दर्जासाठीचे निकष अतिशय कडक असून त्याची पूर्तता वेळोवेळी करण्यात आली. मात्र, अनेकदा स्वच्छतागृहातील साहित्य चोरीस जाणे तसेच अनावधानाने ते निकष पूर्ण झालेले नसल्याने हा दर्जा मिळालेला नाही. मात्र, पालिकेकडे आणखी महिनाभराचा कालवधी असून हा दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करणार असल्याचे मोळक म्हणाले.