दौंड-सिद्धटेक रस्त्यावर साईडपट्ट्यांही खोदल्या

१८ किलोमीटरच्या रस्त्यावर फुटाफुटांवर खड्डे

देऊळगाव राजे – दौंड-सिद्धटेक रस्त्यावर परतीच्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. सिद्धटेक हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण असून, या अठरा किलोमीटरच्या प्रवासासाठी नागरिकांना आणि गणेशभक्तांना एक तास लागत आहे. त्यातच या रस्त्याच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्या सहा महिन्यांपूर्वी खोदल्या असून त्या अद्याप भरल्या नसल्याने अरुंद व खड्डेमय रस्त्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दौंडपासून सिद्धटेक हे साधारणपणे 18 किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावर सुमारे 1 फुटापासून ते 2 फूट खोलीपर्यंत खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने नागरिकांना दुचाकी आणि चारचाकी गाड्या खड्ड्यातून अंदाज घेत चालवाव्या लागत आहेत, त्यामुळे कित्येक ठिकाणी दुचाकीस्वार चिखलात घसरून पडत आहेत, तर चारचाकी चालकांनाही गाडीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम चालू झाले होते ते ठेकेदार या रस्त्याचे काम सोडून गेल्याने काम बंद पडले होते; परंतु आता नवीन ठेकेदारांची नेमणूक या कामासाठी झालेली असतानाही दौंड ते सिद्धटेक रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसून, मध्यंतरी निवडणूक काळात मतदानाअगोदर दोन दिवस या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यारील खड्डे मुरुमाने बुजविण्यास सुरुवात केली होती; परंतु निवडणुका झाल्यानंतर ठेकेदाराने अजूनही काम सुरू केलेले नाही, असेच दिसते आहे.

दौंड-सिद्धटेक रस्ता पूर्ण खराब झाला आहे; पण आम्ही ठेकेदाराकडून आजपासून रस्त्याचे काम चालू केले आहे.
– रावसाहेब कबिले, शाखा अभियंता, दौंड

दौंड सिद्धटेक रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांच्या कामाकडे दुर्लक्ष करत असून, या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविले नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. – वीरधवल जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.