बायकांना दिवाळीच्या खरेदीचे वेध नवरात्राच्या आधीपासूनच लागतात. त्यात हल्ली नवरात्रात नऊ दिवस रंग दाखवायचे असतात ना! नवरात्रात दोन महिलांमधील संवाद कानावर पडतोच…
‘ए उद्या राखाडी रंग ना! पण माझ्याकडे राखाडी रंगाची साडीच नाही ग.’ ‘अग पण तू गेल्या वर्षी दिवाळीत घेणार होतीस ना?’ ‘हो ग. पण एवढ्या दिवाळीसारख्या सणाला कुठे ती राखाडी रंगाची साडी घ्यायची? म्हणून नाही घेतली. छान मोरपीशी रंगाची घेतली.’
तर बायकांची साडी खरेदी ही न संपणारीच असते. कितीही साड्या असल्या तरी दुसऱ्या बाईने नेसलेली साडी बघून त्यांच्या तोंडून उद्गार येतातच, ‘ए तिची साडी काय छान दिसतेय. मला पण अशा रंगाची साडी घ्यायचीय.’ गंमत म्हणजे असे करता-करता बरेच रंग होतात आणि प्रत्यक्ष साडी खरेदीला गेल्यावर ‘हिरवी नको ग साडी, जांभळी दाखव रे बाबा’, असंच दुकानदाराला सांगत असतात.
बिचारा दुकानदार! पतीराज बरोबर असले तर ते मात्र वैतागलेले असतात की, कधी एकदा रंग पसंत पडतोय. हे सगळे रंग बघता बघता वेगळाच रंग भुरळ पाडतो. खरेदी करून घरी आल्यावर ‘अय्या! अशा रंगाची साडी होती की माझ्याकडे,’ असं म्हणत, छान साडी घेतली असली तरी त्याच रंगाची घेतल्यामुळे या बायकांचा मूड जातो.
काही वेळा दुसरीची साडी बघून “तशीच साडी घ्यायची हा हेका.’ अग आमच्या ऑफिसमधल्या मॅडमनी येवल्याहून पैठणी आणलीय. तिथे “रीअल पैठणी’ छान मिळतात. तर त्या अगदी मिरवत असतात की माझी पैठणी अगदी येवल्याची आहे. खरं सांगू, मला काही त्यांच्या पैठणीचा रंग एवढा खास नाही वाटला. अगदी टिपिकल पैठणीचा रंग आहे. आता किती छान छान रंग मिळतात.
मी या वर्षी दिवाळीसाठी येवल्याहून पैठणी आणणार आहे. अगदी हटके रंग घेणार आहे. मग त्या मॅडमना मला पण सांगता येईल की, मी पण येवल्याहून पैठणी आणलीय.’ साडीच्या किमतीवर बरेच काही अवलंबून असते. महाग साड्या घेण्याकडे त्यांचा कल असतो. काय तर म्हणे स्टेटसला शोभली पाहिजे.
बायकांचा साड्यांचा मोह ओळखून विक्रेते पण वेगवेगळ्या ऑफर ठेवतात. मग काय आणखीनच क्रेझ. कुठे एकवर एक फ्री तर कुठे कॉम्बो ऑफर. तेवढ्याच पैशात दोन साड्या मिळतात ना; मग ही संधी घ्यायचीच. तर हल्ली ऑनलाईन शॉपिंग पण बायका करतात आणि काही वेळा ऑनलाईन दिसणारा साडीचा लुक प्रत्यक्ष हातात आल्यावर एवढा वेगळा रंग आणि हलक्या दर्जाची साडी असते की ती साडी बघूनच बायकांच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. काही बायका तर एकदम खट्टू झालेल्या असतात. का तर त्यांचा नवरा त्यांना कधी आपणहून साडीच आणत नाही; किंवा साडी घेण्यासाठी बजेट ठरवून देतो, त्यात त्यांच्या पसंतीची साडी येत नाही.
दुसऱ्यांच्या छान साड्या बघून वाटत असेल ना की, आपली पण अशी महागातली साडी नेसायची हौस व्हायला हवी. तर मग मी एक उपाय सांगते. समजा अडीच हजाराची साडी घ्यायचीय पण नवरा एकदम एवढे पैसे देत नाहीये. तर मग बॅंकेत महिना दोनशे रुपयाचं 12 महिन्यांच रीकरिंग उघडा. मग या पैशातून तुम्ही मनासारखी साडी घेऊ शकता. जिला जेवढ्या रुपयाची साडी घ्यायचेय त्या हिशोबाने रीकरिंगचं खात उघडा, पण अर्थात महिन्याला किती पैसे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात, त्या हिशेबानेच. तर चला मग खट्टू होऊ नका. या वर्षी दिवाळीदरम्यान रीकरिंग उघडा आणि पुढच्या वर्षी मनपसंत साडी घ्या. मग अगदी पदरावरती जरतारीचा मोर नाचवत तुमचा मनमोर पण छान पिसारा फुलवेल आणि दिवाळी छान साजरी होईल.
– अचला धारप