पुणे – अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या पुण्यातील थेऊर येथे दर महिन्यातील संकष्टीचतुर्थी दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी हडपसर आगारातून नियोजित तीन आणि जादा चार बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे चतुर्थीदिवशी थेऊर येथे जाणाऱ्या भाविकांना दर पंधरा मिनिटांना बस उपलब्ध होणार असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) हडपसर आगाराशेजारील दत्तमंदिर स्थानकावरून सध्या चतुर्थीच्या दिवशी “पीएमपीएल’च्या तीन बसेस सोडल्या जातात. मात्र, थेऊर येथे जाणारी प्रवासी संख्या विचारात घेता या गाड्या कमी पडत आहेत. यामुळे दर संकष्टी चतुर्थीला थेऊरसाठी चार जादा बसेस गुरुवारपासून (दि.17) सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या बससेवेचा प्रवाशांनी जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे.