उदयनराजेंपुढे पुन्हा मिशीवाल्याचेच आव्हान; तर दोन मिशीवाल्यांची मिळतेय साथ
सातारा – सलग तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक थोडी आव्हानात्मक असल्याची चर्चा जोर धरत आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढताना उदयनराजेंना महायुतीच्या मिशीवाल्याने घाईला आणले होते. केवळ चार महिन्यांत राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या आणि आता लोकसभेची पोटनिडवणूक महायुतीकडून लढवत असलेल्या उदयनराजेंच्या समोर पुन्हा एका मिशीवाल्या पाटलांचेच आव्हान आहे. मात्र, हे मिशीवाले श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत.
मिशीवाल्या पाटलांचा सामना करणाऱ्या उदयनराजेंच्यासोबत दोन मिशीवाले असून या दोन मिशीवाल्यांची साथ निर्णायक ठरणार असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पोटनिवडणुकीत मिशीचीच चर्चा जास्त रंगली आहे. राष्ट्रवादी का भाजप असे तळ्यातमळ्यात करणाऱ्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीत राहूनच लोकसभेची निवडणूक लढवली. राष्ट्रवादीकडून भाजपमध्ये आणि पुन्हा तिकीटासाठी भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या नरेंद्र पाटील या मिशीवाल्यांनी उदयनराजेंपुढे तगडे आव्हान ठेवले होते. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत राहिला आणि उदयनराजे निवडूनही आले. पण, विरोधी मिशीवाल्या पाटलांच्या पारड्यात तब्बल चार लाखांपेक्षा जास्त मते पडली आणि हाच विषय चर्चेचा ठरला.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आणि तेही राजेंच्या विरोधात एका मिशीवाल्याला मिळालेली मते उदयनराजेंच्या लोकप्रियतेला धक्का पोहोचवणारी होती. लोकसभेची निवडणूक झाली आणि आणखी एक मिशीवाले राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये गेले. यामुळे उदयनराजेंच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि हे मिशीवाले दुसरे तिसरे कोणी नसून दस्तुरखुद्द उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेले आणि उदयनराजेंविरोधात लढलेले मिशीवाले पाटील आणि शिवेंद्रराजे यांच्या मिसळीची केमिस्ट्री पुन्हा एकदा जुळून आली. शिवेंद्रराजेंच्या भाजपमध्ये जाण्याने उदयनराजेंच्या गोटात चलबिचल सुरु होती.
उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि तेही भाजपवासी झाले. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. उदयनराजेंच्या विरोधात कोण, असा प्रश्न निर्माण झाला. एका भाषणात उदयनराजेंनी मी फक्त दोन मिशीवाल्यांना घाबरतो अशी टिपणी करत नरेंद्र पाटील आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या मिशीवाल्यांचा उल्लेख केला होता. पोटनिवडणूक लागली आणि उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीने आणखी एका मिशीवाल्यांना रिंगणात उतरवले. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील या तगड्या मिशीवाल्याचे आव्हान आता उदयनराजेंच्या समोर आहे.
निवडणूक प्रचार शिगेला पोहचला असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. गत निवडणुकीत मिशीवाल्या पाटलांनी (नरेंद्र पाटील) उदयनराजेंचे मताधिक्य घटवले होते. केवळ चार महिन्यानंतर सलग दुसऱ्यांदा उदयनराजेंच्या समोर पुन्हा मिशीवाले पाटील (श्रीनिवास पाटील) उभे ठाकल्याने उदयनराजेंना ही निवडणूक कशी होणार, याबाबत उत्सुकता आहे.
उदयनराजेंसाठी एक जमेची बाजू म्हणजे त्यांच्याविरोधात एक मिशीवाला असला तरी त्यांच्या बाजूने मात्र दोन मिशीवाले आहेत.
एक नरेंद्र पाटील आणि दुसरे शिवेंद्रराजे. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे एकत्रित म्हणजेच एकाच पक्षाकडून. उदयनराजे लोकसभा तर, शिवेंद्रराजे विधानसभा निवडणूक लढवत आहेत आणि दोघांमध्ये पुन्हा मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. हे दोन मिशीवाले उदयनराजेंच्या साथीला असल्याने शिवेंद्रराजेंमुळे सातारा- जावळी आणि नरेंद्र पाटलांमुळे पाटण मतदारसंघ उदयनराजेंच्या पथ्यावर पडेल, असे मानले जात आहे. एका मिशीवाल्यासेबत लढताना उदयनराजेंचे मताधिक्य कमालीचे कमी झाले होते. त्यामुळे आता या नवीन मिशीवाल्या उमेदवाराच्या विरोधात लढताना उदयनराजेंना किती मताधिक्य मिळणार आणि काय निकाल लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.