प्रसारण दिनांकापूर्वी तीन दिवस परवानगीसाठी अर्ज आवश्यक
नगर – राजकीय पक्ष आणि उमेदवारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तसेच सोशल मीडियावर प्रचारासाठी केल्या जाणऱ्या जाहिरांतींना पूर्वप्रमाणन करुन घ्यावे लागणार आहे. प्रसारण दिनांकाच्या तीन दिवस आधी ही जाहिरात प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक असून त्याशिवाय, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात त्यांना प्रसारित करता येणार नसल्याचे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणम समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांना प्रचारासाठीचा मजकूर राज्यस्तरीय समितीकडून प्रमाणित करुन घ्यावा लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रसारित होणाऱ्या जाहिराती या प्रमाणीकरण केलेल्या असल्या पाहिजेत. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत कार्यालय येथे माध्यम प्रमाणीकरणासाठी माध्यम प्रमाणीकरण व सनियंणत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाकडून प्रसारणासाठीचा आवश्यक मजकूर प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
उमेदवार अथवा त्यांच्याकडून केल्या जाणा-या राजकीय पक्षांच्या जाहिराती यांना प्रसारणपूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे. उमेदवारांनी ते करणार असलेल्या जाहिरातीचा मजकूर आणि ऑडिओ/ व्हिडीओ यांच्या 2 सीडीज आणि त्यामधील मजकुराच्या प्रमाणीत प्रतीसह माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर मजकूर प्रसारणासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच प्रसारित करावी लागणार आहे. यासाठीचा खर्च संबंधित उमेदवारांच्या खात्यात नोंदविणे आवश्यक आहे.
विनापरवानगी कोणताही जाहिरात मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडियातून प्रसारित करण्यास प्रतिबंध राहणार आहे. अधिकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रसारणापूर्वी किमान तीन दिवस तर अपक्ष उमेदवारांना प्रसारणापूर्वी सात दिवस अगोदर मजकूर प्रमाणीकरणासाठी समितीकडे सादर करावा लागणार आहे. ज्ल्हिा पोलीस दलाचा सायबर सेल विभागही निवडणूक काळात सोशल मीडियावर लक्ष ठेवून असणार आहेत. याशिवाय, वर्तमानपत्रात उमेदवारांकडून दिल्या जाणा-या जाहिरातीवरही ही समिती लक्ष ठेवणार असून त्याचा अहवाल खर्च नियंत्रण समितीकडे पाठविला जाणार आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण समितीबरोबरच संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील कार्यरत मीडिया सेलही पेड न्यूज आणि इलेक्टॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित बातम्यांबर लक्ष ठेवून असणार आहे.
माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे अर्ज करताना विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक आहे. यात अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, जाहिरात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने दिली आहे का, ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, त्या मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाच्या मुख्यालयाचा पत्ता, ज्या वाहिनीवर/केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करण्याचे प्रस्तावित आहे, त्या वाहिन्या/ केबल नेटवर्क, जाहिरात सादर करण्याचा दिनांक, जाहिरातीमध्ये वापरलेली भाषा (यथोचितरित्या साक्षांकित केलेल्या प्रतिलेखांसह इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममधील दोन प्रतींसह जाहिरात सादर करणे आवश्यक), जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मिती खर्च, जाहिरातीच्या संख्येची विभागणी आणि अशा प्रत्येक जाहिरातीच्या प्रस्तावित दरासह प्रस्तावित प्रसारणांचा अदमासे खर्च, एकूण समाविष्ट खर्च, जाहिरात निर्मिती आणि प्रसारण यांच्याशी संबंधित असलेले सर्व प्रदान धनादेश अथवा डिमांड र्ड्राफ्टद्वारे करण्याबाबत हमीपत्र आदी माहिती देणे आवश्यक राहणार आहे.
उमेदवारांनी कोणत्याही स्वरुपात पेड न्यूजचा प्रकार करु नये.
एकाच उमेदवारांविषयी विविध वर्तमानपत्रात वारंवार येणारा समान मजकूर, एकाच उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तविणारे वृत्तांकन, तसेच अन्य उमेदवारांऐवजी ठराविक उमेदवारच विजयी होणार असल्याची खात्री देणारा मजकूर अशा स्वरुपाचे पेड न्यूज प्रकार उमेदवारांनी टाळावे. जाहिरात स्वरुपातील असे वृत्त बातमी स्वरुपात पैसे अथवा वस्तूंच्या मोबदल्यात वर्तमानपत्रांना दिले जाऊ नये. तो पेड न्यूजचा प्रकार ठरेल. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती वृत्तपत्रात येणाऱ्या अशा संभाव्य उमेदवारांच्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवर लक्ष ठेवून असल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे.