पिंपरी – शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज खरेदीसाठी पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांची झुंबड पहायला मिळाली. आज पहिल्या दिवशी पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 30, त्यापाठोपाठ चिंचवड मतदारसंघात 15 व भोसरी मतदारसंघामध्ये 13 उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज विक्री झाली असली तरी पहिल्या दिवशी मात्र एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.
शुक्रवारपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्जाची विक्री व अर्ज दाखल करून घेण्यास प्रारंभ झाला असून 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जासोबत दाखल सादर करायची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरु असल्याचे दिसून आले. पितृपक्ष संपून रविवारपासून नवरात्री सुरु होणार आहे. यामुळे सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.