पक्षातील स्थान दाखवून दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत
नवी दिल्ली : साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला पंतपप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहिल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. उदयनराजे यांना राष्ठ्रवादीत केले तसे चाळे भाजपात खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश त्यातून दिला असल्याचे मानले जात आहे.
उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पक्षावे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच उपस्थित होते. महाराष्ट्रातील हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
राजे यांनी पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील, अशी माहिती खद्द राजेंनी आपल्या ट्विटर अकौंटवरून दिली होती. पंतप्रधानांच्या उपस्थितीतच पक्षप्रवेश करेन, अशी अट त्यांनी घातल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीने भाजपाने उदयनराजे यांना त्यांचे पक्षातील स्थान दाखवून दिले. केवळ छत्रपती शिवरांचे थेट वंशज म्हणूनच अमित शहा उपस्थित होते. अन्यथा तेही या समारंभाकडे फिरकले नसते, अशी कुजबूज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.