भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या व्यक्तींची एक यादी अलीकडेच प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांना मागे टाकून सनी लिओनने अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. गुगल ट्रेडस आणि सर्च हिस्ट्रीनुसार सनी लिओनशी संबंधित व्हिडीओ आणि फोटोंचा सर्च घेतला गेलाच पण त्याच्याबरोबर सनी लिओनचा बायोपिक “करणजीत कौर द स्टोरी ऑफ सनी लिओन’चा सर्चदेखील केला गेला.
सनी लिओनने या यशाचे श्रेय आपल्या टीमला आणि आपल्या फॅन्सला दिले आहे. गुगलवर सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीमधून भारतातून गेल्यावर्षीही सनी लिओनचाच क्रमांक अव्वल राहिला होता. पॉर्न स्टारचे लेबल मागे सोडल्यानंतरही सनी लिओनची क्रेझ अजूनही कायम आहे. नवीन बिजनेस, रिऍलिटी शोचे परीक्षण, बॉलीवूड सिनेमांची सहनिर्मिती आणि 3 मुलांची आई या जबाबदाऱ्या ती यशस्वीपणे पार पाडते आहे.
गेल्या सहा महिन्यांत ती खूपच बिझी राहिली आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून वेळ काढून तिला स्वतःचे वेगळे नियोजन करायला लागते आहे. दोन वर्षांपूर्वी सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते. त्या मुलीचे नाव निशा आहे. आता या दाम्पत्याने “डी आर्ट फ्युजन’ या नावाने प्ले स्कूलची एक शाखाही सुरू केली आहे.
मनोरंजन विश्वापासून दूर शिक्षणक्षेत्रात शिरकाव करण्याचा सनीचा हा प्रयत्न आहे. शिक्षण माणसाला समृद्ध बनवते, यावर तिचा नितांत विश्वास आहे. निशाच्या बरोबर आशर आणि नोहा या जुळ्या मुलांची ही सनी आई आहे. त्यांच्या पालन-पोषणाकडे तिला लक्ष केंद्रित करायचे आहे. काही रिऍलिटी शोमध्येही ती सहभागी होते आहे. पण आता या सगळ्यापेक्षा कुटुंबाला अधिक वेळ देणे हेच तिने प्राधान्य ठरवले आहे.