सुपरस्टार हृतिक रोशन केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक आणि आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या “टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ या यादीमध्ये हृतिक रोशनने स्थान पटकावले आहे.
हा मान मिळविण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. कारण तो बॉलीवूडमधील सर्वात हॅन्डसम हिरोपैकी एक आहे. त्यांची पर्सनॅलिटी आणि लूक खूपच लोकप्रिय आहे. त्याचा अलीकडेच रिलीज झालेला “सुपर.30′ खूपच लोकप्रिय झाला आहे. त्याच्या आतापर्यंतच्या ऍक्शन हिरोच्या इमेजला फाटा देऊन त्याने हा हटके रोल स्वीकारला आणि आपल्या अभिनयाने त्या रोलला न्यायही दिला. त्याच्या या रोलबद्दल देशभरातून त्याचे कौतुक केले जात आहे. आता पुन्हा एकदा हृतिक रोशन ऍक्शन हिरोच्या रोलमध्ये दिसणार आहे. “वॉर’मध्ये टायगर श्रॉफबरोबर तो आपले आवडते स्टंट करताना दिसणार आहे.
हृतिकला बॉलीवूडमध्ये येऊन 19 वर्षे पूर्ण झाली. पण त्याच्या हॅन्डसम लूकची क्रेझ अजूनही युवा वर्गात आहे. “कहो ना प्यार है’चा रिमेक करण्याची जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा त्या सिनेमाच्या रिमेकची काय गरज आहे? असे त्याने विचारले. तर जर रिमेक करायचाच असेल तर त्यात नवोदित ऍक्टरला घेतले जावे असा सल्लाही त्याने दिला आहे, त्याने स्वतःही हा सिनेमा केला होता, तेव्हा तो देखील बॉलीवूडमध्ये नवोदितच होता. त्यामुळे नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे त्याचे धोरण योग्यच मानले पाहिजे.